वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये स्कॅनर नसल्याने लोकांची गैरसोय हत असून लोकांना त्यांचे मुळ दस्त मिळण्यास महिनोंमहिने वाट पहावी लागत आहे. दरम्यान, संबंधित प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनिष सातार्डेकर यांनी केला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-आदिम-जमातींना-वीज-पुर/
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बँक अथवा इतर सहकारी संस्था यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतर वा कर्ज मिळविण्यासाठी संबंधित खरेदीखत, गहाणखत, साठेखत, हक्कसोडपत्र, बक्षिसपत्र, अखत्यारपत्र, मृत्यूपत्र या स्वरूपाची मूळ दस्तऐवज बँकेत अथवा सहकारी संस्थांमध्ये जमा करणे अनिवार्य असते अशावेळी दस्त मिळण्यास बराच कालावधी लागत असल्याने लोकांना कर्ज प्रकरणामध्ये विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, नगरपरिषद अशा सरकारी संस्थांमध्ये देखील सदर मूळ दस्तांची विचारणा केली जाते. त्यावेळी देखील लोकांना गैरसोईला सामोरे जावे लागते.
मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क स्वरूपात शासनाला कोट्यावधीचा महसूल मिळतो. मात्र, अशा नोंदणी कार्यालयामध्ये दहा ते पंधरा रूपयांना मिळणारा स्कॅनर असू नये ही मोठी लाजीरवाणी बाब आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन वेंगुर्ला दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये त्वरित स्कॅनर उपलब्ध करून द्यावा व लोकांची होत असलेली गैरसोय वेळीच थांबवावी अशी मागणीही अॅड.सातार्डेकर यांनी केली आहे.