🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला l प्रतिनिधी –
तुळस – राऊळवाडी येथील रहिवासी गुरुदास रविद्र तिरोडकर (वय३१) याचा गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शिरोडा – वेळागर सुरुची बाग येथे मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मुख्यमंत्री-सौर-कृषी-वा/
तुळस-राऊळवाडी येथील रहिवासी गुरुदास तिरोडकर हा बुधवार १८ रोजी सकाळी ९ वाजता कुडाळ येथे मित्राच्या लग्नाला जातो असे सांगून घरातून निघून गेला. दरम्यान तो सायंकाळी घरी न परतल्याने आज गुरुवारी त्याचा भाऊ विवेक रविद्र तिरोडकर यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात बेपत्ताची खबर दिली होती. त्यानुसार वेंगुर्ला पोलीस स्थानकात नापत्ता नद करण्यात आली होती. दरम्यान आज गुरूवारी गुरुदास याचा मृतदेह शिरोडा-वेळागर येथे आढळून आला. याबाबत माहिती मिळताच वेंगुर्ला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. सायंकाळी उशिरा वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. दरम्यान त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार योगेश राऊळ हे करीत आहेत.
त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहीत भाऊ, वहिनी, विवाहित बहिण असा परिवार आहे. गुरूदास याने काही महिन्यांपूर्वी वेंगुर्ला शहरात ‘मंगलमूर्ती एंटरप्रायझेस‘ या नावाने स्वतःचा लहान व्यवसाय सुरू केला होता. तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान आणि आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला यांचा तो सक्रीय पदाधिकारी होता. या दोन्ही मंडळांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्याचा महत्त्वाचा वाटा असायाचा. शांत, सुस्वभावी गुरूदासच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबासहीत मित्रपरिवारावर तसेच तुळस गावावर शोककळा पसरली आहे.