रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक अनेक राजकीय नेत्यांना धक्का देणारी ठरली आहे. या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ४७ हजार ८५८ मतांनी विनायक राऊत यांचा पराभव केला. निवडणूक रिंगणात असलेल्या उर्वरित ७ उमेदवारांवर मात्र अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-शिवसेना-जिल्हा-संघटक-श्र-3/
लोकसभेच्या या निवडणूक रिंगणात एकूण ९ उमेदवार होते. त्यापैकी ७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे. यामध्ये आयरे राजेंद्र लहू ७,८५६, अशोक गंगाराम पवार ५,२८०, मारुती रामचंद्र जोशी १०,०३९, सुरेश गोविंदराव शिंदे २,२४७, तांबडे अमृत अनंत (राजापूरकर) ५,५८२, विनायक लहू राऊत १५,८२६, शकील सावंत ६,३९५ अशी मते मिळाली. त्यामध्ये विनायक लहू राऊत यांनी लक्षवेधी मते घेतली तसेच नोटाला ११ हजार ५१६ मते पडली आहेत. यामधील ७ उमेदवारांना अनामत रक्कम वाचवता आलेली नाही.
एकूण वैध मते ९ लाख २ हजार ३९५ आहेत. या वैध मतांच्या १/६ मते न मिळाल्याने सात जणांची प्रत्येकी २५ हजारांची अनामत जप्त होणार आहे. १ लाख ७५ हजार शासन दरबारी जमा होणार आहेत. निवडणूक विभागाने याला दुजोरा दिला.