⭐ मुख्याधिकारी कंकाळ – गेल्या दहा वर्षात वेंगुर्ल्यातील बचत गटांचे कामकाज उल्लेखनीय
वेंगुर्ला -: बचतगटांना बाजारपेठ मिळवून देताना महिलांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपिठ म्हणजे वेंगुर्ला नगरपरिषद. सिधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत दहा महिला बचतगटांचे व्यवसायासाठी अनुदानीत कर्ज प्रस्ताव मंजूर झाले आहेत. अधिकाधिक बचत गटांनी व्यवसाय करण्यासाठी पुढे यावेत. त्यासाठी नगरपरिषद सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी बचत गट स्नेहमेळाव्याप्रसंगी दिले. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-वेंगुर्ले-वेतोर/
दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान, माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत ११ मार्च रोजी कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात बचत गट स्नेहमेळावा घेण्यात आला. यावेळी व्यासपिठावर पर्यावरण दूत डॉ.धनश्री पाटील, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, साप्ताहिक ‘किरात‘ संपादक सीमा मराठे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे, हिरकणी शहर स्तर संघ अध्यक्ष मेघा पडते उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षात वेंगुर्ल्यातील बचत गटांचे कामकाज हे विशेष उल्लेखनीय आहे. जवळपास ११० महिला बचत गट सध्या कार्यरत असून यातून महिला आर्थिक स्तर वाढविण्यात हातभार लागत आहे, याबद्दल सीमा मराठे यांनी नगरपरिषदेचे कौतुक केले.
या मेळाव्यात बचत गटांना प्रोत्साहन म्हणून उत्कृष्ट सीआरपी-सुशिला रेडकर, उत्कृष्ट बचत गट-आशा महिला बचत गट, उत्कृष्ट वस्ती स्तर संघ ओम-शामल केनवडेकर, उत्कृष्ट वस्ती स्तर संघ अध्यक्ष वैभवी पालव, उत्कृष्ट बचत गट अध्यक्ष स्मिता कोणेकर, उद्योजक-स्वाती बेस्ता, बचतगटातील अष्टपैलू व्यक्तीमत्व-शिवानी तामणेकर, जॉयसी फर्नांडीस, निर्मल कुडपकर, सुहानी जाधव, आस्मीना मकानदार यांना तसेच प्रातिनिधीक स्वरूपात मेघना घाटकर व सेजल जाधव या सफाई कर्मचा-यांना गौरविण्यात आले. पर्यावरण दूत म्हणून डॉ.धनश्री पाटील यांना तर स्वच्छता दूत म्हणून सीमा मराठे यांना मान्यवरांच्या हस्ते बांबूपासून बनविलेले पर्यावरण पूरक कंदिल देऊन सन्मानीत करण्यात आले. तर बचतगटांसाठी विविध योजना राबवून महिलांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी प्रयत्नशील असणारे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना सर्व बचतगटांमार्फत सन्मानीत करण्यात आले. स्नेहमेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उपक्रम घेण्यात आले.
अक्षय ऊर्जेचा वापर म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण, आर्थिक वाढ आणि सामाजिक आरोग्याला योगदान देणारे आहे. याचे महत्त्व महिलांपर्यंत पोचविण्यासाठी व नुकतीच जाहीर झालेली ‘‘प्रधानमंत्री सुर्योदय योजना‘‘ याची माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आदींविषयी भूषण राणे यांनी मार्गदर्शन केले. ‘कोकेडामा‘ हे घर किवा कार्यालयासाठी आकर्षक व सौंदर्यदृष्ट्या आनंददायी भेट आहे. याची वाढती मागणी बघता ही एक व्यवसायाची संधी ठरत आहे. हे लक्षात घेत ‘कोकेडामा‘ तयार करण्याचे व त्यापासून व्यवसाय कसा निर्माण करण्याचे प्रशिक्षण डॉ. धनश्री पाटील यांनी दिले. घरात निर्माण होणारा ओल्या कच-यापासून घरीच खत निर्मिती, ओल्या कच-याचे व्यवस्थापन घरगुती स्तरावर करून त्यापासून आपल्या जमिनीची जैविक गुणवत्ता कशी वाढवावी यासंबंधीचे प्रात्यक्षिक प्रा.प्रितिश लाड यांनी दिले. महिलांना कचरा वर्गीकरण व प्लॅस्टिक बंदी याबद्दलची जागृती सोप्या पद्धतीने खेळांच्या माध्यमातून करण्यात आली. नगरपरिषदेमार्फत विविध मनोरंजक स्वच्छतेचे खेळ घेण्यात आले. सर्व महिलांनी या वसुंधरेचे रक्षण व संवर्धन करण्याची शप्पथ घेतली.
सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत ज्या बचतगटांचे ७५ टक्के अनुदानीत कर्जप्रस्ताव मंजूर झाले. त्यामध्ये खाद्यपदार्थ, काजूप्रक्रीया युनिट, मसाला व्यवसाय, नारळापासून विविध खाद्यपदार्थ बनविणे, सुकेमासे इत्यादी व्यावसायिक बचतगटांना पुढे व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. डे एनयूएलएम अंतर्गत यावर्षी मंजूर झालेले वैयक्तीक कर्जप्रस्ताव, बचतगटांचे कर्जप्रस्ताव, पीएम स्वनिधीमधील कर्जप्रस्ताव यांचा आढावा घेऊन त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शहरातील बचत गटांतील महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्याचे सूत्रसंचालन मयुरी परब आणि ऐश्वर्या सावंत यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार संगीता कुबल यांनी मानले.अधिकाधिक बचत गटांनी व्यवसाय करण्यासाठी पुढे यावे त्यासाठी नगरपरिषद सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी बचत गट स्नेहमेळाव्याप्रसंगी दिले.
फोटोओळी – बचतगटांसाठी विविध योजना राबवून महिलांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी प्रयत्नशील असणारे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना सर्व बचतगटांमार्फत सन्मानीत करण्यात आले.