Maharahtra: येत्या चार – सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा मिळवू – जयंत पाटील

1
145
जयंत पाटील,निळवंडे धरण,
कोविडच्या भयंकर परिस्थितीत निळवंडे धरणाचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले याचे समाधान - जयंत पाटील

पुणे – अन्य राज्यांमध्ये निवडणूका लढवून त्यात किमान चार टक्के मते मिळवणे व लोकप्रतिनिधी निवडून येणे हा जो नियम आहे त्यामध्ये थोडीशी कमतरता झाली असेल परंतु येत्या चार – सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा सहज आम्हाला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शासकीय-वैद्यकीय-महाविद/

राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह महाराष्ट्रापुरते कायम राहिल यात शंका नाही पण देशातील वेगवेगळ्या राज्यात आम्ही नागालँडमध्ये निवडणूका लढवल्या तिथे सात आमदार निवडून आले आहेत. लक्षद्वीपमध्ये आमचे खासदार आहेत परंतु तिथे विधानसभा नाही. त्यामुळे ते राज्य गृहीत धरले जात नाही हेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सर्व एजन्सीमार्फत जो वापर होतोय तो कोण व कसा करतेय त्याविषयी सतत भाष्य करण्याची आवश्यकता नाही कारण याबाबत सर्वांना माहित आहे. परंतु राष्ट्रीय पातळीवरील दर्जा जाण्याचे जी घटना घडली आहे त्यात आम्ही काही अटी पूर्ण करु शकत नाही त्या अटी आम्ही भविष्यकाळात पूर्ण करू असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

ही घटना पक्षासाठी सेटबॅक आहे असे मला वाटत नाही कारण घड्याळ या चिन्हाचा महाराष्ट्रातील हक्क आमचा गेलेला नाही. त्यामुळे येत्या चार – सहा महिन्यानंतर हा दर्जा पुन्हा आम्हाला प्राप्त होईल. या  निर्णयाने महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

काही पक्षांची काहीकाळ क्रेझ असते. ‘आप’ ने मागच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात व भारतातील काही राज्यात वेगवेगळी आश्वासन दिलेली आहेत. त्या आश्वासनावर काही ठिकाणी मतदान झाले आहे. राष्ट्रवादी जी जमेल तेवढीच आश्वासने देण्याची भूमिकेवर ठाम आहे. राज्य करण्याच्या ज्या काही पध्दती आहेत. त्यात विकासाचे मॉडेल आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधा, सोयीसुविधा, शेतकरी शेतमजूर आणि मध्यमवर्गीयांसाठी सुधारणा ही आमची सतत व सातत्याने भूमिका राहिली आहे. त्यामुळे आम्ही कुठेही जाऊन जी शक्य नाही अशी आश्वासने देण्याच्या भानगडीत पक्ष पडला नाही. त्यामुळे काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त मते पडत असतील त्याबद्दल आमची तक्रार नाही परंतु आमचे धोरण सातत्याने या देशातील व महाराष्ट्रातील जनतेसाठी अनेक सुविधा निर्माण करताना हे समाजाभिमुख धोरण आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या तिजोरीचा वापर करून वारेमाप पैसे वाटणे आणि लोकांना खुश करणे ही भूमिका आमच्या सरकारने (जेव्हा जेव्हा सत्तेत होतो) आणि आमच्या पक्षाने केव्हाही घेतली नाही. आता ‘आप’ सर्व ठिकाणी जाऊन सगळ्याच घोषणा करत आहे त्यामुळे सर्वच गोष्टी मोफत द्यायची तयारी त्यांची असते. त्यांच्या आश्वासनांची लोकांना भुरळ पडते व लोक त्यांना फॉलो करतात. मतदानही करतात परंतु राज्याची आर्थिक व्यवस्था जेव्हा खिळखिळी होते त्यावेळी या मोफत गोष्टी शक्य होत नाहीत. याचा पंजाबमध्ये जनतेला अर्थव्यवस्थेचा अभ्यास केल्यावर अनुभव यायला लागला आहे. त्यामुळेच अशी मोठी आश्वासने देणे याचा कधीतरी विचार झाला पाहिजे असेही जयंत पाटील म्हणाले.

आमच्या पक्षाने प्रो भाजप भूमिका कधीच घेतलेली नाही. आणि अद्यापही घेतलेली नाही. कोणत्या विधानाचा भाजप सोयीस्कर अर्थ लावत असेल तर त्यासाठी आम्ही विधाने करतोय असे समजायचे कारण नाही असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.

अदानींचा विषय स्पष्ट आहे. लोकसभा आणि विधानसभेत पवारसाहेबांनी कित्येक वर्षे काढली आहेत. जेपीसीसमोर संख्या बळाचा निर्णय होतो ही साधी भूमिका मांडली आहे. अदानींची चौकशी व्हायला विरोध नाहीच आहे पवारसाहेबांनी तसे स्पष्टही केले आहे. सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन केली आहे त्यात चौकशी होणारच आहे. त्यामुळे अदानींच्या चौकशीला आमच्या पक्षातील लोकांनी विरोध केला नाही फक्त जेपीसीमुळे कितपत काही गोष्टी आपल्या हातात येतील याविषयी शंका असल्यामुळे पवारसाहेबांनी ते विधान केले होते असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

सावरकर हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्राला सावरकरांबद्दल जी भूमिका आहे तीच वेळोवेळी व्यक्त होते आहे त्यामुळे सावरकरांबद्दल आम्ही वेगळी भूमिका व्यक्त केली आहे असे आम्हाला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी सावरकर गौरव दिन साजरा केला. सावरकर दिनाबरोबरच अनेक प्रश्न राज्यात महत्त्वाचे आहेत. विशेषत: अयोध्येला मुख्यमंत्री गेले. आम्ही अवकाळीने सरकारचे लक्ष नाही म्हटल्यावर शिवारात जाऊन पाहणी करत आहेत. त्यामुळे या सरकारचे अशा मोठ्या घोषणा करुन यांचा गौरव, दिन त्यांचा गौरव दिन सुरू आहे मात्र जमीनीवर सामान्य माणसांच्या महागाईच्या विरोधात काही निर्णय नाही. अवकाळीने नुकसान झाले त्याबद्दल निर्णय नाही. यांच्या बाकीच्याच घोषणा जास्त आहेत. त्यामुळे या सरकारच्या प्रत्येक घोषणेविषयी शंका येत आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

आयपीएलवर पैसे कुणी उडवले, कधी उडवले. आयपीएल ही व्यवस्था निर्माण झाल्यावर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात क्रिकेटपटूंना एक खेळण्याचे व्यासपीठ मिळाले आणि शेकडो खेळाडू आपली स्कील दाखवायला लागले. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, निवृत्त झाले तर पुढे काय? याचे प्रश्नचिन्ह भारतात आता राहिले नाही. त्याचे श्रेय आयपीएल स्पर्धेला मिळते. क्रिकेटमध्येच नाही तर सर्वच खेळांमध्ये आयपीएल सध्या सुरु झाले आहे. त्यामुळे पैसे उडवण्याचा प्रश्नच येत नाही. या खेळातून पैसा मिळतो तो माजी सर्व खेळाडूंना कसोटीपटू, रणजीपटूंना मानधन दिले जाते. हे कधीच झाले नव्हते. ऐनभरात आलेला खेळाडू निवृत्त झाल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायचे परंतु अशा सर्व खेळाडूंची काळजी या आयपीएलमुळे निर्माण झालेल्या संपत्तीतून घेतली जात आहे. याचे कौतुक करायच्याऐवजी चुकीच्या टिका करणे हे थांबले पाहिजे आणि पवारसाहेबांनी जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागे शरद पवारसाहेब धावून गेले आहेत. हे विसरता येणार नाही हे जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here