मुंबई दि. १० एप्रिल – अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही. अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडत आहे. पंचनामे ताबडतोब करणे व तात्काळ मदत करणे अशी भूमिका राज्यसरकारची दिसत नाही याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आज राष्ट्रवादी भवन येथे बैठकीला आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी सरकारच्या अयोध्या दौर्यावर भाष्य केले आहे. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजनस्टोरीटेल-मराठी/
राज्यातील शेतकरी, शेतमजूर संकटात असताना अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडलेला असताना, अशावेळी शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती मात्र सरकार अयोध्येला जाऊन बसले आहे. पहिल्यांदाच देवाच्या दर्शनासाठी अख्खं सरकार जाते हा प्रकार पहिल्यांदाच दिसतो आहे त्यामुळे या सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नाही. म्हणूनच ते महाराष्ट्राबाहेर फिरण्याचे काम व त्याला प्रचंड प्रसिद्धी देण्याचे काम करतेय असा थेट हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.
जेपीसीची मागणी करत असताना समितीत सत्ताधारी लोकांची संख्या जास्त असते त्यामुळे निष्कर्ष त्यांच्या हातात असतो. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जी कमिटी नियुक्त केली आहे. ती कमिटी चांगल्या प्रकारे चौकशी करेल हा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे बाकी वेगळे काही नाही असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मांडले .
डिग्री आहे म्हणून ते पंतप्रधान झाले असे म्हणण्याचे कारण नाही. पंतप्रधानांनी डिग्री आहे असे सांगितले तर त्या डिग्रीची चिकित्सा पब्लिक डोमेनमध्ये आल्यावर होणारच. या देशातील नागरीक आपापल्या मार्गाने चिकित्सा करत आहेतच. त्यांची डिग्री आहे म्हणून त्यांना पंतप्रधान केले नाही. पण त्यांनी एकदा ही माझी डिग्री आहे असे सांगितले तर त्याची चिकित्सा होणारच. लोकशाहीत लोकांमध्ये आलेल्या चर्चेची चिरफाड होणे व वेगवेगळी मते व्यक्त होणे व त्याचा खरेपणा किंवा खोटेपणा प्रसिद्ध होणे त्यावर लोकांनी मते मांडणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे ज्यांची डिग्री आहे ती माझी आहे की नाही यावर कोणतेही भाष्य पंतप्रधान करत नाही तोपर्यंत ही मतमतांतरे आणि लोकं चर्चा करणारच ते कोण थांबवू शकत नाही असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.