🔥 दैनिक सिंधुदुर्ग समाचार l पुणे l 30 नोव्हेंबर
पुण्यातील हवेली तालुक्यातील फुलगाव गावात एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. अंगणात खेळत असणाऱ्या ८ वर्षाच्या मुलाने हातात बैलाला बांधलेली दोरी घेतली. याच वेळी बैल बिथरला आणि पळत सुटला. त्या दोरीबरोबर मुलगा देखील फरपटत गेला. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. शौर्य शैलेश वागस्कर (वय-८) असं मृत्यू झालेल्या चिमुलकल्याचे नाव आहे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
याबाबत अधिक माहिती अशी की, शौर्य हा अंगणात खेळत असताना त्याने अंगणातील बैलाला बांधलेली दोरी हातात घेतली. त्यावेळी बैल बिथरल्याने तो पळत सुटला आणि या मोठ्या दोरीने शौर्यच्या गळ्याभोवती आणि अंगावर फास बसला. त्यामुळे तो बैलाच्या मागे दोरीमुळे फरपटत गेला. काही अंतरापर्यंत त्याला बैलाने फरपटत नेले. या घटनेत त्याला जबर मार लागला. बाहेर कसला तरी आवाज आल्याने त्याचे पालक धावत बाहेर आले. शौर्यला तातडीने जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शौर्य हा फुलगाव येथील शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. तर घरात तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.