शक्ती आणि भक्तीचा अनोखा संगम
रंगपंचमी आणि नुकत्याच साजऱ्या झालेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून आणि माऊली हरीत अभियाना अंतर्गत रविवार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी शांभवी-अजानवृक्षाचे आंबेगाव (बु.), पुणे शहर स्थित शिवसृष्टीत विधिवत पूजन करून शिवसृष्टी-सरकारवाडा प्रांगणात मान्यवरांच्या आणि शिवप्रेमींच्या – भाविकांच्या उपस्थितीत रोपण करण्यात आले. सदर हरित उपक्रमाचे आयोजन बायोस्फिअर्स संस्था आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले होते. याप्रसंगी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. विनीत कुबेर, पर्यावरण शास्त्रज्ञ आणि बायोस्फिअर्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन अनिल पुणेकर, भारतीय मजदूर संघाचे जेष्ठ पदाधिकारी श्री. दिपक कुलकर्णी, संत साहित्याचे अभ्यासक श्री. दत्तात्रय गायकवाड, आंबेगावचे प्रतिष्ठित श्री. संतोष दांगट, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्री. विलास कोळी, श्री. प्रमोद साळुंखे, शिवविचारांचे पाईक श्री. पराग शिळीमकर, श्री. गणेश मानकर, श्री. रोहन जगताप, श्री. अमित जगताप, श्री. संजय गोळे, श्री. महादेव दिवटे, श्री. अभिजित राऊत, श्रीमती. मीनाक्षी कुलकर्णी आणि मोठ्या संखेने शिवप्रेमी आणि शिवसृष्टीचा शिवविचारांनी प्रेरित कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या पर्यावरणीय, सांस्कृतिक व अध्यात्मिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाच्या वृक्षाच्या बाबतीत जनमानसात जाण वाढावी या उद्देशाने मराठी भाषेतील या वृक्षाच्या माहिती पत्रकाचे अनावरण महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. विनीत कुबेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच शिवसुमन (फ्रेरीया इंडीका) या शिवरायांच्या नावाने नामकरण असणाऱ्या दुर्मिळ वनस्पतीच्या सचित्र अशा द्विभाषिक माहितीपत्रकाचे अनावरण देखील झाले, याप्रसंगी मान्यवरांनी त्यांचे विचार मांडून पुढील शिव आणि हरित कार्यास शुभेच्छा दिल्या. सदर उपक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरिता महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त श्री. जगदीश कदम आणि व्यवस्थापक श्री. अनिल पवार, तसेच अध्यात्माचे गाढे अभ्यासक श्री. गिरीश गोखले आणि आयोजक संस्थाचे पदाधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य मिळाले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एच३एन२-फ्ल्यू-संदर्भा/
पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या सरकारवाडा प्रांगणात या ज्ञानवृक्षाचे रोपण करण्यात आले. शिवसृष्टी ही आशिया खंडातील महत्वाची मध्ययुगीन मराठ्यांच्या – भारताच्या इतिहासावर भाष्य करणारी प्रदर्शिनी आणि थीम पार्क आहे. फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील – परदेशातील इतिहास प्रेमींसाठी ही महत्वाची जागा आहे. शिवसृष्टी अनेक अर्थांनी शिवविचारांचा – शिवनीतीचा जागर करणारी वास्तू आहे. शिवरायांचा आणि सहकारी मावळ्यांचा दैदिप्यमान, गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या महत्वाच्या केंद्रात शांभवी-अजानवृक्षाचे रोपण होणे ही एक महत्वपूर्ण घटना आहे. सदर अजानवृक्षाचे रोप हे श्री क्षेत्र आळंदीयेथील सिद्धबेट या पुरातन शिवपीठातील (निवृत्तीनाथ-ज्ञानदेव-सोपानदेव-मुक्ताई यांची जन्मभूमी, लीलाभूमी, कर्मभूमी) मूळ अजानवृक्षापासून तयार करण्यात आले आहे, जणू त्याचीच प्रतिकृती. संत साहित्याचा अभ्यास केला असता श्री संत ज्ञानेश्वर माऊली व अजानवृक्ष यांचे दृढ नाते लक्षात येते. श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांनी देखील समाधिस्त होण्यापूर्वी जो दंड रोवला होता तो देखील याच वृक्षाचा होता. यावरून माऊलींची संजीवन समाधी व अजानवृक्ष हे एक समीकरणच झाले आहे. नाथ, दत्त आणि वारकरी संप्रदयात ह्या देव-वृक्षाला विशेष महत्व दिले आहे. गोरक्षवल्ली, योगवल्ली, योगिनी, शांभवी, निधी, पूर्णधन, अजानवृक्ष अश्या अनेक नावांनी हा वृक्ष सुपरिचित आहे. सदर रोपाला रोपणावेळी भारतातील विविध पवित्र क्षेत्रातून, नद्यांमधून आणि सह्याद्रीतील गड-कोटांवरून संकलित केलेले पवित्र जल अर्पण करण्यात आले.
बायोस्फिअर्स संस्थेच्या माध्यमातून ‘माऊली हरित अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानाचाच एक महत्वाचा पैलू म्हणजे श्री क्षेत्र आळंदी – सिद्धबेट येथील मूळ ज्ञानवृक्ष-अजानवृक्षाची रोपे सर्वदूर (योग्य त्या ठिकाणी) पोहचवणे होय. एकुणातच काय या औषधी आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या ज्ञानवृक्षाच्या संवर्धनासाठी तसेच आपल्या संस्कृती, परंपरेमधल्या महत्वाच्या वारसा वृक्षाबाबत जनमानसात-भाविकांत काही अंशी जाण वाढावी, त्यांच्यात योग्यती सकारात्मकता यावी या उद्देशाने अजानवृक्ष सर्वदूर करीत आहोत. आजपर्यंत या हरित वारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील, भारतातील अनेक तीर्थक्षेत्रे, गडकोट, मंदिरे, अध्यात्मिक-केंद्रे, संजीवन समाधी, विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्था यांच्या आवारात याचे रोपण व संवर्धन करण्यात आले आहे. यापुढेही भारतातील अनेक ठिकाणी या वारसा ज्ञानवृक्षाचे रोपण होत राहणार आहे. खऱ्या अर्थाने भक्तीचे प्रतीक असलेला अजानवृक्षाचे आणि शक्तीचे प्रतिक असणाऱ्या शिवसृष्टीत रोपण होणे हे विशेष. जणू शक्ती आणि भक्तीचा सुरेख संगमच…!