मुबंई- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित कॉल एका सराईत गँगस्टरने केला असून तो सध्या बेळगाव तुरुंगात कैदेत आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून त्याने हे कॉल केल्याचे समोर आले आहे.
गडकरी यांच्या कार्यालयात फोन कॉलच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचे नाव जयेश पुजारी असून तो हत्या प्रकरणात बेळगाव जेलमध्ये कैदेत आहे. यापूर्वी 2016 मध्ये तो जेल तोडून पळून गेला होता. शिवाय त्याने जेलमधूनच अशाच पद्धतीने अनेक वेळा पूर्वी ही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. गडकरी यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या धमकी मागे एकटा जयेश पुजारी आणि त्याची टोळी आहे की अंडरवर्ल्डचे काही मोठे गॅंगस्टर यामागे आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहे.
पुढील तपासासाठी नागपूर पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे. कर्नाटकमधील तुरुंगातून असे गैरप्रकार सुरू असल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयजवळील जनसंपर्क कार्यालयात तीन वेळेस धमकीचा फोन आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या धमकीच्या फोन कॉलनंतर तपास चक्र वेगाने फिरले. एटीएस आणि नागपूर पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, तीन वेळेला आलेल्या धमकीच्या फोन कॉलचा संबंध कर्नाटकात असल्याचे समोर आले होते. धमकीचा फोन बीएसएनएलच्या दूरध्वनीवरुन करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली होती.
तीन वेळेस धमकीचा फोन, 10 कोटींच्या खंडणीची मागणी
नितीन गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालय जवळच्या जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी एका तासाच्या कालावधीत तीन वेळेस धमकीचे फोन कॉल आहे. हे तीन फोन कॉल सकाळी 11:29 वाजता, 11:35 वाजता आणि 12:32 वाजता या दरम्यानच्या वेळेस आले होते. फोन कॉल करणाऱ्याने नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडे दहा कोटींची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम न दिल्यास गडकरी यांना जीवे मारू अशी धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने दाऊद असा शब्द उच्चारल्यानंतर गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचारी घाबरले. त्यांनी लगेच पोलिसांना घटनेची माहिती दिली.