Maharashtra: राज्यात महागाईचा आगडोंब!

0
16
Inflation
राज्यात महागाईचा आगडोंब!

कडधान्ये, पालेभाज्या, तेलाचे दर कडाडले कांद्याने आणले डोळ्यात पाणी

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/ सिंधुदुर्ग/ 09

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच आता ऐन लग्नसराईच्या दिवसांत महागाईत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोजच्या वापरात लागणा-या सामानांच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणींचे बजेट बिघडले आहे. सध्या बाजारात कांदा, बटाटासह पालेभाज्या, कडधान्य आणि लसूण महाग झाले आहेत. राज्यात पुन्हा महागाईत वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-काँग्रेस-कार्यकर्ते-जनत/

किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये किलोने कांद्याची विक्री केली जात आहे. वाढत्या महागाईत कांद्याची विक्री कमी झाल्याने विक्रेत्यांचेही नुकसान होत आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. पुढील एक महिनाभर कांद्याचे भाव तेजीतच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबईमध्ये घाऊक बाजारात कांद्याचे भाव ४० ते ६० रुपयांवरून ७० ते ८०, १०० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांत कांद्याचे भाव दुपटीने वाढले आहेत.

पालक आणि मेथीची मोठी जुडी ही आधी १० रुपयांना मिळायची, पण आता तीच २५ रुपयांना मिळत आहे. गवार १० रुपये पाव किलो मिळत होती, पण आता २५ रुपये पाव किलो झाली आहे. १० रुपयांना मिळणारा पूर्ण सुरण आता फक्त त्याची एक फोड २५ रुपयांना मिळत आहे. ही भाजी एका वेळेसही पुरत नाही. मूग, मटकी, काळे वाटाणे, काबुली चणे यांच्या भावात मागील दोन महिन्यांत प्रतिकिलो ४० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येक भाजीपाल्यात, कडधान्यात आणि डाळींमध्ये वाढ झाली आहे. किमान २५ ते ४० रुपयांची वाढ आहेच. पालेभाज्या परवडत नाहीत म्हणून कडधान्यांचा पर्याय असतो, पण तेही महाग झाले आहेत. तेलाची एक लिटरची पिशवी ११० ते १२५ रुपयांना होती. आता त्याची किंमत थेट १६५ रुपये झाली आहे, तर पामतेल १०० रुपयांवरून थेट १३० रुपयांना मिळत आहे. तांदूळ, गहू, नारळ सर्व महाग झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here