
मुंबई, : लहान वयात आपण ज्या क्लब अथवा अकादमीचे प्रतिनिधित्व करतो त्यांच्याशी कायम एकनिष्ठ रहा असे आवाहन भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवडसमितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी युवा खेळाडूंना केले. लहान वयात आपल्या गुणवत्तेला खतपाणी घालण्याचे काम करून आपल्या गुणवत्तेला बहर आणण्याचे काम जी अकादमी किंवा क्लब करते त्यांना विसरून चालणार नाही. पुढे तुम्ही चांगले खेळू लागलात कि अन्य क्लब अथवा अकादमी तुम्हाला त्यांच्या संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमिष दाखवतील अशा वेळी त्याला भुलू नका असे देखील वेंगसरकर यांनी या युवा खेळाडू तसेच त्यांच्या पालकांना आवाहन केले. ड्रीम ११ कप या १३ वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. या स्पर्धेत एम.आय.जी. क्रिकेट क्लब संघाने ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीवर ५ विकेट्सनी मात करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दिलीप वेंगसरकर फौंडेशनच्या वतीने ओव्हल येथील अकादमीच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-केंद्र-सरकार-व-राज्य-सरका/
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने निर्धारित ३५ षटकांत ८ बाद १५० धावांचे लक्ष्य उभारले. वंश धवांगळे (२७) आणि आरुष कोल्हे (३६) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेली ५१ धावांची भागीदारी आणि नंतर वरद राज याच्या ४४ धावांच्या खेळी मुळे त्यांना हे शक्य झाले. एम.आय.जी.संघाचा आर्यन देसाई सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २५ धावांत ३ बळी मिळविले तर आयन रॉड्रिग्स याने १२ धावांत २ बळी मिळवत त्याला मोलाची साथ दिली.
या आव्हानाचा पाठलाग करताना एम.आय. जी संघाला आर्यन खोत (४३) आणि अगस्त्य काशीकर (३५) या जोडीने ८७ धावांची सलामी दिली, तर नंतर वेदांग मिश्रा (३९) आणि मनन सिंघवी (१४) या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी आणखी ५२ धावांची भर टाकून आपल्या संघाचा विजय निश्चित केला. ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या अंश सोनवणे याने २२ धावांत २ बळी मिळविले. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आर्यन देसाई याची निवड करण्यात आली. वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक – ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी – ३५ षटकांत ८ बाद १५० (वंश धवांगळे २७, आरुष कोल्हे ३६, वरद राज ४४; आयन रॉड्रिग्स १२ धावांत २ बळी, आर्यन देसाई २५ धावांत ३ बळी ) पराभूत वि. एम.आय. जी क्रिकेट क्लब – ३३.२ षटकांत ५ बाद १५४ (आर्यन खोत ४३, अगस्त्य काशीकर ३५, वेदांग मिश्रा ३९; अंश सोनावणे २२ धावांत २ बळी) सामनावीर – आर्यन देसाई .