मुंबई १ मार्च : “आपल्याला जीवनात नक्की काय व्हायचे आहे ते ठरवून त्या ध्येय पूर्तीसाठी मोठी स्वप्न पहा आणि ती स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कठोर मेहनत करा, यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेईल” असे भारताचा नवोदित फलंदाज यशस्वी जैस्वाल याने युवा खेळाडूंना सांगितले. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्या चार कसोटीत ९३.५७ च्या सरासरीने ६५५ धावा आणि त्यात सलग दोन कसोटीत द्विशतक ठोकण्याचा पराक्रम करणाऱ्या यशस्वीने आपल्या या कामगिरीने मुंबईतील तमाम युवा पिढीला मोहिनी घातली आहे. खार जिमखान्याच्या वतीने घेण्यात आलेल्या ७८व्या सेठ गोरधनदास करसनदास चॅम्पिअनशिप क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी यशस्वी जैस्वाल याला प्रमुख पाहून म्हणून बोलाविण्यात आले आणि युवा क्रिकेटपटूंनी त्याचे आगमन होताच “जैस्वाल…जैस्वाल.. अशा घोषणा दिलेल्या पाहून तो भावुक झाला. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-शाळा-नं-४-ला-शा/`
एका छोट्याशा गावातून येऊनही जैस्वालने आपली यशोगाथा जगासमोर आणली त्यामुळेच मोठी स्वप्न पहा, त्याचा पाठलाग करा आणि कठोर मेहनत घेतल्यास ती नक्की पूर्ण होतील असे त्याने सांगितले. आपल्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या मुंबई क्रिकेट संघटनेचे आणि वेळोवेळी सरावासाठी सुविधा पुरविणाऱ्या खार जिमखाना यांचे देखील त्याने आभार मानले. यशस्वी जैस्वाल याच्या हस्ते या स्पर्धेचे विजेते यंग मुस्लिम स्पोर्ट्स क्लब यांना विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली तर उपविजेते ठरलेल्या अवर्स क्रिकेट क्लब संघाला देखील जैस्वाल याच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून मॅनेजर गुप्ता याची तर सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अमन तिवारी याची निवड कारणात आली. यावेळी खार जिमखान्याच्या अध्यक्ष विवेक देवनानी, मुंबई क्रिकेट संघटनेचे कोषाध्यक्ष अरमान मलिक, सी.ई.ओ . सी.एस. नाईक, एम.सी.ए. च्या अपेक्स कौन्सिलचे कौशिक गोडबोले, भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजिओ जॉन ग्लॉस्टर, मुंबई क्रिकेट निवडसमितीचे सदस्य संजय पाटील, जावेद रिझवी, नवीन शेट्टी आणि दिनेश नानवटी आणि खार जिमखान्याच्या सर्व पदाधिकाऱ्यानी हजेरी लावली होती.
अंतिम फेरीत यंग मुस्लिम स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १११ धावा केल्या ज्यात यश नाईकने सर्वाधिक ४५ धावा केल्या तर राकेश नाईक (२४) आणि हनुमंत म्हात्रे (१९) यांनी देखील त्यात खारीचा वाटा उचलला. अवर्स क्रिकेट क्लब साठी विराट मिश्रा, आतिष वाळींजकर आणि दीपक सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना अवर्स क्रिकेट क्लब संघ १९ षटकातच १०० धावांत गारद झाला. जतीन घरत ( नाबाद २९) आणि दीपक सिंग (२४) जोडीने ७ बाद ४४ वरून आठव्या विकेटसाठी ५३ धावांची भागी रचून त्यांना विजयाची आस दाखवली होती, मात्र ही जोडी फुटली आणि त्यांचा डाव १०० धावांत आटोपला. संदीप यादव याने १६ धावांत ४ बळी मिळविले तर प्रथमेश गोडबोले (१७ धावांत ३ बळी ) आणि राकेश नाईक (७ धावांत २ बळी) यांनी त्याला चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक – यंग मुस्लिम स्पोर्ट्स क्लब – २० षटकांत ८ बाद १११ ( यश नाईक ४५, हनुमंत म्हात्रे १९, राकेश नाईक २४; विराट मिश्रा १५ धावांत २ बळी, आतिष वाळींजकर २३ धावांत २ बळी, दीपक सिंग १८ धावांत २ बळी) वि.वि. अवर्स स्पोर्ट्स क्लब – १९ षटकांत सर्वबाद १०० (मॅनेजर गुप्ता १५, जतीन घरत नाबाद २९, दीपक सिंग २४; संदीप यादव १६ धावांत ४ बळी, प्रथमेश गोलतकर १७ धावांत ३ बळी, राकेश नाईक ७ धावांत २ बळी).
********
फोटो ओळी – खार जिमखाना आयोजित ७८व्या सेठ गोरधनदास करसनदास चॅम्पिअनशिप क्रिकेट स्पर्धेत विजेता ठरलेल्या यंग मुस्लिम स्पोर्ट्स क्लब संघाला ट्रॉफी प्रदान करताना भारताचा नवोदित फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि मध्यभागी खार जिमखान्याचे अध्यक्ष विवेक देवनानी दिसत आहेत.