मुबंई- यंदाच्या दिवाळीत प्रवाशांनी एसटीला पसंती दिली आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नाचा नवा विक्रम झाला आहे. २० नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्नाची नोंद झाली असून या एका दिवसात राज्यातून ३७ कोटी ६३ लाख रुपयांची कमाई झाली. यापूर्वी १६ नोव्हेंबर रोजी ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर, गेल्या २० दिवसांत एसटीचे उत्पन्न ५१० कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-कॉलेज-तरुणीला-ओढून-गाडीत/
दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या भाडेवाढीत १० टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. मात्र तरीही प्रवाशांनी एसटीकडे पाठ न फिरवता प्रतिसाद दिला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त राज्य सरकारने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीतून मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. तसेच ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठांना आणि महिलांना तिकीटदरात ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीसाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढली आहे. दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीकडून जादा बस फेऱ्या चालवण्यात आल्या. त्या गाडय़ांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एसटीने उत्पन्नाचा विक्रम रचला. १ ते २० नोव्हेंबर दरम्यान एसटीचे उत्पन्न ५१० कोटी रुपये झाले. तर, ८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ३९० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. महसूल वाढीसाठी दिवाळीच्या हंगामात सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ केली होती. सध्या केलेली भाडेवाढ ८ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत लागू असेल. त्यानंतर नेहमीप्रमाणे तिकीट दर लागू होतील.