जयंत पाटील यांच्यावरील कारवाई भाजपवरच बुमरँग होईल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक १७ मे रोजी
मुंबई – कर्नाटकातील जनतेने धर्मनिरपेक्ष शक्तींना निवडले असून येत्या काही महिन्यात इतर राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये हाच कल कायम राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत आज व्यक्त केला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सफाई-कामगारांच्या-वारस/
विधानसभा निवडणुकीत जवळपास ५० टक्के जागा गमावून मोठा पेच निर्माण करणाऱ्या भाजपला कर्नाटकने साफ नाकारले आहे.ज्या पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला असतानाही भाजपचा दारुण पराभव होतो याचा अर्थ पंतप्रधानांची प्रतिमा घसरली आहे हे स्पष्ट होते असा थेट हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला. दरम्यान कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. आता शिंदे – फडणवीस सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही व्यापक प्रचार मोहीम राबवणार असल्याचे महेश तपासे यांनी जाहीर केले.
रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात काय म्हटले आहे आणि महाविकास आघाडीला घालवण्यासाठी राज्यपालांच्या कार्यालयाचा दुरुपयोग कसा झाला हे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगणार असल्याचेही महेश तपासे यांनी सांगितले.
अचानक आलेल्या उष्णतेमुळे महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभा पुढे ढकलण्यात आली होती आणि आता हवामानाच्या परिस्थितीनुसार पुन्हा सुरु करुन या सभेत कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही महेश तपासे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर भाजप करत असल्याचा आरोप महेश तपासे यांनी करतानाच जयंत पाटील हे उच्च सचोटीचे आणि नैतिक चारित्र्याचे व्यक्ती आहेत हे महाराष्ट्राला ठाऊक आहे, त्यामुळे केंद्रीय एजन्सींद्वारे दबाव आणून त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही भाजपचा हा डाव त्यांच्यावरच बूमरँग होईल असेही महेश तपासे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही भाजपच्या हृदयावर जड दगड असून त्यांच्यात सर्व काही आलबेल आहे असे दिसत नाही. ठाण्यातील शिंदे पदाधिकारी हे भाजप नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे करू देत नसल्याची तक्रार मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. नवीन मुंबई कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचे श्रेय उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना घेऊ दिले नाही आणि फडणवीस यांनीच हे नाव सुचविले होते याची आठवणही महेश तपासे यांनी करून दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बुधवार दिनांक १७ मे रोजी सकाळी ११ वाजता चव्हाण सेंटर मुंबई येथे आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहितीही महेश तपासे यांनी यावेळी दिली.
समीर वानखेडे प्रकरणावर आता भाजपचे नेते गप्प का आहेत, असा सवाल महेश तपासे यांनी केला असून, वानखेडेचे गुणगान करणारे भाजपचे काही नेते आता गप्प बसले आहेत असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.