मुंबई- गोसेवा आयोगाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार लवकरच राज्यातील गोशाळा आणि पशुपालन करणाऱ्या सेवाभावी संस्थांना अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी विधानसभेत दिले. मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-तहसील-कार्यालयात-जाते-अस/
यापूर्वीच्या अधिवेशनात शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना तसेच गोशाळा चालवणाऱ्या संस्थांना प्रती गाय १०० रुपये अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने ५ रुपये प्रती लिटर दुधाला अनुदान देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या १५ जुलै रोजी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होईल.
त्याच बरोबर दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी दुधाची भुकटी निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना ३० रुपये प्रति किलो अनुदान देण्यात येत असल्याचे असेही विखे-पाटील म्हणाले. पशुधन संरक्षण, गोमता संरक्षणाची व्याप्ती वाढवायची असेल, तर त्यासाठी संस्थांना अधिक मदत आवश्यक आहे, अशी भूमिका मंत्री मंगल प्रभात लोढा सातत्याने मांडत आहेत. त्याबाबत शासन सकारात्मक आहे, असेही मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.