Maharashtra: जयसिंगपूर येथे प्रिन्स सुनील पाटील यांनी संग्रहित केलेल्या महिलांच्या टपाल तिकिटांचे आगळे – वेगळे प्रदर्शन

0
36
जयप्रभा इंग्लिश मिडीयम स्कूल, जयसिंगपूर 
जयसिंगपूर येथे प्रिन्स सुनील पाटील यांनी संग्रहित केलेल्या महिलांच्या टपाल तिकिटांचे आगळे - वेगळे प्रदर्श

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l जयसिंगपूर (प्रतिनिधी)

जयप्रभा इंग्लिश मिडीयम स्कूल, जयसिंगपूर आणि दि ग्रेट इंडियन हॉबी अकॅडमी, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जगभरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या जीवन व कार्य यांच्या गौरवार्थ टपाल विभागाच्या वतीने प्रकाशित झालेल्या टपाल तिकिटांचे एकदिवशीय प्रदर्शन शनिवार दिनांक १५ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

जयप्रभा इंग्लिश मिडीयम स्कूल, जयसिंगपूर येथील इयत्ता सातवीमध्ये शिकणारा एक आदर्श विद्यार्थी मास्टर प्रिन्स सुनील पाटील हा अगदी लहानपणापासूनच पुस्तकांच्यामध्ये रमणारा मुलगा आहे. अगदी त्याचे नाव शाळेत दाखल करण्यापूर्वीच अर्थात शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच त्याला लिहायला – वाचायला येत होते. मासिके, दिवाळी अंक, विश्वकोश, चरित्र आणि विज्ञान, लहान – लहान गोष्टींची पुस्तके हे त्याच्या आवडीचे आहेत. मौजे धरणगुत्ती गावातील शेकडो मुले नियमितपणे विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करतात आणि टपाल तिकिटांचा संग्रहसुद्धा जोपासतात या निमित्ताने मौजे धरणगुत्ती गावात वाचणार्‍यांचा एक कंपू तयार झाला आहे. 

मास्टर प्रिन्स सुनील पाटील याच्या आई – वडीलांनी त्यांच्या वैयक्तिक टपाल तिकीट संग्रहालयातील टपाल तिकिटांचा प्रचंड मोठा संग्रह गावातील सर्व मुलांसाठी खुला केल्यामुळे अनेकांना त्याचा मोठा फायदा झाला. यानिमित्ताने अनेक नवीन वाचक तयार होत असताना मास्टर प्रिन्स सुनील पाटील याच्या वाचनालासुद्धा गती आली आणि त्यामुळे तो सध्या दररोज एकतरी पुस्तक वाचत आहे. तसेच पुस्तके वाचून त्या – त्या लेखक आणि कवींना त्यावर लेखी प्रतिक्रियाही देत आहे आणि त्याच्या फावल्या वेळेत त्याचा टपाल तिकीट संग्रह वाढवत आहे.  

मास्टर प्रिन्स सुनील पाटील याने आई – वडीलांच्या मदतीने संकलित आणि विकसित केलेल्या टपाल तिकिटांचे सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असलेले प्रदर्शन त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवार दिनांक १५ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत जयप्रभा इंग्लिश मिडियम स्कूल, जयसिंगपूर, जिल्हा – कोल्हापूर येथे भरवण्यात आले आहे.

महाराणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, पंडीता रमाबाई, इंदिरा गांधी, मदर टेरेसा, महाराणी जिजाबाई, भगिनी निवेदिता, कस्तुरबा गांधी या आणि अशा अनेक थोर महिलांनी स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. अशा कर्तबगार महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या आठवणी पोस्टाने टपाल तिकिटांच्या आणि पाकिटांच्या माध्यमातून कायमस्वरूपी जतन करून ठेवल्या आहेत त्याचा अनोखा संग्रह धरणगुत्ती येथील मास्टर प्रिन्स सुनील पाटील आणि पाटील दांपत्याने केला असून अनेक ठिकाणी ते या महिलांवर पोस्टाने काढलेल्या तिकिटांचे आणि पाकिटांचे आगळे – वेगळे प्रदर्शन सातत्याने भरवत असतात.

सौ. संजीवनी सुनील पाटील म्हणाल्या, “महिलांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू दाखविणारे हे दुर्मिळ स्टॅम्प्स असून ऐतिहासिक काळापासून ते अलिकडच्या काळापर्यंत महिलांच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत गेला याचे दर्शन या प्रदर्शनात घडणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांवर पोस्टाने काढलेल्या तिकिटांचा संग्रह या प्रदर्शनात पाहता येईल. यात रणरागिणी, क्रांतीकारी, स्वातंत्र्यसेनानी, राजकीय, समाजसुधारक, पोलिस, शिक्षणतज्ज्ञ, अभिनेत्री, गायिका, महाराण्या अशा विविध महिलांचा समावेश आहे.”

जागतिक किर्तीचे टपाल तिकिट संग्राहक आणि लेखक डॉ. सुनील दादा पाटील म्हणाले, “ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास रचला अशा महिलांच्या कार्याची गाथा आजच्या पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन जयसिंगपूर येथे भरविण्यात येत आहे. अशा प्रकारचे हे आगळे – वेगळे प्रदर्शन असून ते सर्वसामान्यांना टपाल तिकिटांचा छंद जोपासण्यासाठी जागृत करेल असा विश्वास आहे.”

जगभरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या जीवन व कार्य यांच्या गौरवार्थ संकलित केलेला अत्यंत दुर्मिळ असा टपाल तिकिटांचा संग्रह हा एक अनोखा ठेवा असून तो अत्यंत मौल्यवान दस्तावेज आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना याचा आनंद घेता यावा असा या प्रदर्शनाचे आयोजन करण्यामागचा आमचा मानस आहे. टपाल तिकीट संग्राहक – मास्टर प्रिन्स सुनील पाटील आणि पाटील दांपत्य (धरणगुत्ती) यांनी संकलित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिलांच्या जीवनावरील टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाला भेट देऊन जास्तीत जास्त व्यक्ती आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा यासाठी मुख्याध्यापक राहुल अर्जुन नौकुडकर यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here