मुबंई- देशात डाळी, कडधान्यांचे उत्पादन कमी झाले असून, आयातही मंदावली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरूवात झाली आहे. तीन महिन्यांत प्रत्येक वस्तूंचे दर ३ ते ७ टक्के वाढले आहेत. घाऊक बाजारामध्ये मसूरडाळीनेही शंभरी ओलांडली आहे. उन्हाळ्यामध्येच तेजी सुरू झाल्यामुळे संपूर्ण वर्षभर ही भाववाढ सुरू राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गहू, तांदूळ उत्पादनामध्ये भारत स्वावलंबी झाला आहे. परंतु, कडधान्याच्या बाबतीत अद्याप आत्मनिर्भर होता आलेले नाही. देशवासीयांना वर्षभर पुरेल एवढ्या कडधान्याचे उत्पादन होत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे.https://sindhudurgsamachar.in/kokanसंत-राऊळ-महाराज-महाविद्य/
गतवर्षी उत्पादन घटले व आयातही कमी प्रमाणात होत असल्यामुळे २०२४ च्या सुरूवातीपासून डाळी, कडधान्यांचे दर वाढण्यास सुरूवात झाली आहे. फेब्रुवारीमध्ये ७० ते ७८ रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या मसूरडाळीचे दर ७१ ते ११५ रुपयांवर पोहोचले आहेत. हरभरा डाळ ६५ ते ७८ वरून ६८ ते ८५ रुपये किलो दराने विकली जात आहे. बाजार समितीमध्ये सर्व प्रकारच्या डाळी व कडधान्यांची प्रतिदिन ८०० ते ९०० टन आवक होत आहे. यावर्षी पाऊस वेळेत पडला तर दर स्थिर राहतील. वेळेत पेरणी झाली नाही तर वर्षभर दर वाढत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तीन महिन्यांत चणाडाळ ३ टक्के, चणे ६.५ टक्के, मूगडाळीच्या दरात ३ टक्के वाढ झाली आहे.
मुंबई बाजार समितीमधील बाजारभाव (प्रतिकिलो)
वस्तू फेब्रुवारी एप्रिल
हरभरा ६० ते ८० ६० ते ८५
हरभरा डाळ ६५ ते ७८ ६८ ते ८५
मसूर ६४ ते ७५ ६५ ते ८५
मसूर डाळ ७० ते ७८ ७१ ते ११५
उडीद ७० ते ११२ ८३ ते ११५
उडीदडाळ ९५ ते १४० १०० ते १५०
मूग ८८ ते ११६ ९५ ते १५०
मूगडाळ ९५ ते १४० ९९ ते १४०
तूरडाळ ९२ ते १७० ११० ते १७० .