अरहान पटेलच्या झुंजार खेळीने गावस्कर संघाला आघाडी ; युवान शर्माचे ६ बळी
मुंबई १८ मे : मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत आज पहिल्या दिवशी गावस्कर संघाने दिलीप वेंगसरकर संघाला ९४ धावांत गुंडाळले आणि नंतर अरहान पटेलच्या नाबाद (५२) अर्धशतकी खेळीच्या बळावर पहिल्या डावात २५ धावांची निसटता आघाडी मिळविली. तर कर्नाटक सपोर्टींग (क्रॉस मैदान) येथील दुसऱ्या लढतीत सचिन तेंडुलकर संघाने पहिल्या डावात ७२.१ षटकांत सर्वबाद २९२ धावांची मजल मारली असून पहिल्या दिवसअखेर रवी शास्त्री संघाने १ बाद ११ धावा केल्या आहेत.https://sindhudurgsamachar.in/kokan-झुलता-पुल-येथे-पोलिसांची/
ओव्हल येथील वेंगसरकर अकादमीच्या मैदानावर सुनील गावस्कर संघाच्या झैद खान (१३ धावांत ४ बळी), श्लोक कडव ( ५ धावांत २ बळी) आणि अब्दूर रहमान (११ धावांत ३ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीसमोर दिलीप वेंगसरकर संघाचा डाव ३१.४ षटकांतच ९४ धावांत संपुष्टात आला. सुदान सुंदरराज (२४), आर्यन म्हात्रे (२३) आणि हर्ष कदम (२०) यांचा अपवाद वगळता त्यांचे अन्य फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. मात्र या अपुऱ्या धावसंख्येचे रक्षण करताना युवान शर्माने ४४ धावांत ६ बळी मिळवत गावस्कर संघाला ११९ धावांत गुंडाळण्याची करामत केली. अरहान पटेल नाबाद ५२ आणि अब्दूर रहमान (३०) या जोडीने सातव्या विकेटसाठी केलेली ५१ धावची भागीदारी गावस्कर संघाला आघाडी मिळवून देण्यात यशस्वी ठरली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेंगसरकर संघाने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद १३ धावा केल्या होत्या.
कर्नाटक सपोर्टींगवरील लढतीत आकाश मांगले (६४) आणि युग असोपा (७६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची तर युग आणि आयुष शिंदे (३०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागी रचली. त्यानंतर राम शांडिल्य (४२) आणि धैर्य पाटील (३७) यांच्या उपयुक्त फलंदाजीमुळे त्यांना पहिल्या डावात २९२ धावांची मजल मारता आली. रवी शास्त्री संघाचा शाश्वत नाईक सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५४ धावांत ४ बळी मिळविले तर नीरज धुमाळ (५८/२) आणि युवराज पाटील (५५/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत त्याला छान साथ दिली. पहिल्या दिवसाअखेर रवी शास्त्री संघाने १ बाद ११ धावा केल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक – दिलीप वेंगसरकर संघ – ३१.४ षटकांत सर्वबाद ९४ (सुदान सुंदरराज २४, आर्यन म्हात्रे २३, हर्ष कदम २०; झैद खान १३ धावांत ४ बळी , श्लोक कदम ५ धावांत २ बळी, अब्दूर रहमान ११ धावांत ३ बळी) आणि ५ षटकांत बिनबाद ११ वि. सुनील गावस्कर संघ – ४३ षटकांत सर्वबाद ११९ (प्रयाग शहा १५, अरहान पटेल नाबाद ५२, अब्दूर रहमान ३०; दर्शन राठोड २८ धावांत २ बळी, युवान शर्मा ४४ धावांत ६ बळी).
सचिन तेंडुलकर संघ ७२.१ षटकांत सर्वबाद २९२ (आकाश मांगेला ६४, युग असोपा ७६, आयुष शिंदे ३०, राम शांडिल्य ४२, धैर्य पाटील ३७; नीरज धुमाळ ५८ धावांत २ बळी, शाश्वत नाईक ५४ धावांत ४ बळी, युवराज पाटील ५५ धावांत २ बळी) वि. रवी शास्त्री संघ – ५ षटकांत १ बाद ११ धावा .