Maharashtra: ड्रीम ११ कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा

0
36
ड्रीम ११ कप,
ड्रीम ११ कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा

शेन रझाच्या ६ बळींमुळे  गावस्कर संघाला आघाडी ; गावस्कर संघ आणि शास्त्री संघाला प्रत्येकी ३ गुण

विजय बने 

मुंबई, २४ मे :  मुंबईचा १४ वर्षाखालील खेळाडूंचा संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येत असलेल्या ड्रीम ११ कप निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत आज दुसऱ्या दिवसाच्या खेळात गावस्कर संघाचा वेगवान गोलंदाज शेन रझा याच्या भेदक गोलंदाजीने वेंगसरकर संघाच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. त्याने केवळ ११ धावांत ६ बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघाला २३.१ षटकांतच ८४ धावांत गुंडाळण्याची करामत केली. त्याला नीरज (२८/२) आणि प्रवीर सिंग (१७/२)  यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या या करामतीमुळे ओव्हल मैदानावरील या लढतीत गावस्कर संघाला पहिल्या डावात १९३ धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यांनी दुसऱ्या डावात स्वानंद पालवच्या नाबाद ५२ धावांच्या खेळीनंतर आपला  डाव १ बाद ८३ धावांवर घोषित करून एकूण २७६ धावांचे आव्हान वेंगसरकर संघाला देत निर्णायक विजयासाठी प्रयत्न केले. मात्र दुसऱ्या डावात वेंगसरकर संघाने खेळ संपला तेव्हा २ बाद १३८ धावांची मजल मारली होती. ईशान पाठक याने ३३ तर पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या आरुष कोल्हे याने  नाबाद ९२ धावांची झुंजार खेळी केली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-ड्रीम-११-कप-१४-वर्षंखा/

दरम्यान कर्नाटक सपोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत शास्त्री संघाच्या २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तेंडुलकर संघाने ८०.२ षटकांत सर्वबाद २४० धावा करून पहिल्या डावातील १७ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेण्यात यश मिळविले. श्रेयश खिलारे (६३) आणि हर्ष कदम (५१) या कालच्या नाबाद जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची तर  श्रेयशने  नंतर मानवीर जैन (३८) याच्या साथीने पाचव्या विकेटसाठी आणखीन ६२ धावांची भागीदारी रचत आपल्या संघाला पहिल्या डावातील आघाडी मिळविण्यात सिंहाचा वाटा उचलला. खेळ संपला तेव्हां शास्त्री संघाने दुसऱ्या डावात २ बाद १३९ धावा केल्या होत्या.

संपूर्ण साखळी पद्धतीने खेळविण्यात येणाऱ्या या निवड चाचणी स्पर्धेतील पहिल्या साखळी लढतीनंतर गावस्कर संघ आणि तेंडुलकर संघ यांनी प्रत्येकी ३-३ गुण मिळविले आहेत.  स्पर्धेतील दुसऱ्या साखळी लढती २7-२८ मे रोजी होणार असून गावस्कर संघ वि. तेंडुलकर संघ ही लढत कर्नाटक सपोर्टींगवर तर रवी शास्त्री संघ वि. वेंगसरकर संघ ही लढत ओव्हल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानात होणार आहे.

संक्षिप्त धावफलक – ओव्हल मैदान –  गावस्कर संघ सर्वबाद २७७  आणि २३ षटकांत १ बाद ८३ डाव घोषित (स्वानंद पालव नाबाद ५२) वि. वेंगसरकर संघ – २३.१ षटकांत सर्वबाद ८४ ( आरुष कोल्हे नाबाद ३१; शेन रझा ११ धावांत ६ बळी, नीरज २८ धावांत २ बळी, प्रवीर सिंग १७ धावांत २ बळी)  आणि २ बाद १३८ (ईशान पाठक ३३, आरुष कोल्हे नाबाद ९२).

कर्नाटक सपोर्टींग – शास्त्री संघ – सर्वबाद २३३ आणि ३० षटकांत २ बाद १३९ (यश सिंग ३४, दर्श दोषी ३८, युवराज भिंगारे नाबाद ४६) वि. तेंडुलकर संघ – ८०.२ षटकांत सर्वबाद २४० (श्रेयश खिलारे ६३, हर्ष कदम ५१, सैफ अली ३०, मानवीर जैन ३८; श्रीजाल प्रकाश ३३ धावांत २  बळी, राजवीरसिंग सुर्वे ३१ धावांत ३ बळी, युवराज भिंगारे ३४ धावांत २ बळी).

                                                             ***********

विजय बने – ९८१९०५९६७७

फोटो ओळी –  आपल्या भेदक वेगवान गोलंदाजीने ११ धावांत ६ बळी मिळविणारा गावस्कर संघाचा शेन रझा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here