Maharashtra: दादर युनियन संघाला ड्रीम ११ स्पर्धेचे विजेतेपद; यासिन सौदागर स्पर्धेत सर्वोत्तम !

0
23
दादर युनियन संघ,ड्रीम ११,
दादर युनियन संघाला ड्रीम ११ स्पर्धेचे विजेतेपद;यासिन सौदागर स्पर्धेत सर्वोत्तम

वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या माहुल, चेंबूर येथील मैदानावर झालेल्या ड्रीम ११ कप या १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या दादर युनियन संघाचे छायाचित्र. सोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, ड्रीम स्पोर्ट्स चे प्रशांत तायडे, मंगेश भालेकर दिसत आहेत.

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l विजय बने -मुंबई  : दादर युनियन सपोर्टींग क्लब संघाने ड्रीम ११ या १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळविला. दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या माहुल, चेंबूर येथे झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी प्रतिस्पर्धी साई सिया क्रिकेट क्लब संघावर तब्बल १२५ धावांनी विजय मिळविला. यासिन सौदागर आणि तुषार सिंग हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले.  यावेळी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी खेळाडूंना कायम आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि कायम शिस्तबद्ध राहा कारण तुमची पुढची पायरी ही मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करण्याची असेल.  दादर युनियनला उच्च दर्जाची क्रिकेटची परंपरा आहे आणि आतापर्यंत या क्लबने कितीतरी खेळाडूंना प्रथम श्रेणी आणि कसोटी क्रिकेट साठी संधी मिळवून दिलेली आहे  असेही त्यांनी पुढे सांगितले. या स्पर्धेत तब्बल आठ शतके ठोकली गेली याविषयीही त्यांनी समाधान व्यक्त केले.  यावेळी विशेष अतिथी म्हणून मंगेश भालेकर आणि ड्रीम स्पोर्ट्सचे प्रशांत तायडे देखील उपस्थित होते. मुंबईतील मैदान बचाव मोहिमेत मंगेश भालेकर यांचा हातभार लागला असून दडकर मैदानातील कितीतरी होतकरू आणि गरीब गुणवान खेळाडूंना त्यांनी मदतीचा हात देत त्यांना उच्च दर्जाचे क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले आहे असे वेंगसरकर यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

तत्पूर्वी दादर युनिअन संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ४० षटकांत६ बाद २८७ धावांचे लक्ष्य उभारले. यासिन सौदागर (१०५) आणि तुषार सिंग (४५) या दोघांनी त्यांना १९.३ षटकांतच १२३ धावांची सलामी दिली. यासिन सौदागर याने केवळ ७९ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह १०५ धावा केल्या. त्याला वेदांत देसाई (५५), हर्ष गायकर (२६) आणि वरुण दोषी (२४) यांनी चांगली साथ दिली. साई सिया संघाच्या साई सनील  याने ६७ धावांत २ बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना साईराज सानप (३४), रुद्र सुकाळे (२०), गौतम साठे (४२) आणि सिद्धांत दुबे (३१) यांचा अपवाद वगळता साई सिया संघाच्या  अन्य फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या गाठण्यातही अपयश आले आणि त्यांचा डाव ३६.४ षटकांत १६२ धावांत गडगडला. मंथन (१६/२), शिवम गुप्ता (३०/२) आणि श्रेयान चाळके (२४/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत दादर युनियन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

अंतिम सामन्यात आणि या स्पर्धेत दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह एकूण ३६९ धाव करणाऱ्या यासिन सौदागर याला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम फलंदाज आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अशा तीन पुरस्कारांसह गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून साई सिया संघाच्या ईशान देशपांडे (१२ बळी) याला तर स्पर्धेतील सर्वोउत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून तुषार सिंग (दादर युनियन) यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मंगेश भालेकर आणि ड्रीम स्पोर्ट्सचे प्रशांत तायडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

संक्षिप्त धावफलक –  दादर युनियन –  ४० षटकांत ६ बाद २८७ (यासिन सौदागर १०५, तुषार सिंग ४५, वरुण दोषी २४, हर्ष गायकर २६, वेदांत देसाई ५५; साई सनील ६७ धावांत २ बळी) वि.वि. साई सिया स्पोर्ट्स क्लब – ३६.४ षटकांत सर्वबाद १६२ (साईराज सानप ३४, रुद्र सुकाळे २०, गौतम साठे ४२, सिद्धांत दुबे ३१; मंथन १६ धावांत २ बळी, शिवम गुप्ता ३० धावांत २ बळी, श्रेयान चाळके २४ धावांत २ बळी )

                                                                 ***********

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here