⭐तर आज बुधवारी आणि गुरुवारी दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
–
मुंबई:- १७ ते १८ एप्रिलला मुंबईसह कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील उष्णतेची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. या काळात नागरिकांना उष्माघाताचा प्रचंड त्रास होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी,शक्यतो बुधवारी आणि गुरुवारी दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे देशात कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उष्णतेची लाट दिसून येत आहे. महाराष्ट्रातही मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, मुंबई, ठाणे, रायगडसह किनारपट्टी भागात तापामानात वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात तापमानात वाढ झाल्याचं दिसत आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-अवघ्या-10-तासांत-चोरीचा-ला/
मुंबई, रायगड आणि ठाण्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून सोमवारसह मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरासरी तापमानात ४.५ अंश सेल्सिअसहून अधिक भर पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कमाल तापमान ३७-३९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वातावरणातील कोरडेपणा आणि वाढती उष्णता यामुळे हवामान विभागाने भरपूर पाणी पिण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. याशिवाय सकाळी ११ ते दुपारी ४ वा. दरम्यान घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बाहेर पडण्याची गरज भासल्यास योग्य ती काळजी घ्या. डोके झाकून घ्या, डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल वापरा, असं आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं आहे.
हवामान विभागाकडून एप्रिल महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एप्रिल-जून महिन्यामध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण द्वीपकल्प, मध्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर भारताच्या बहुतेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या शक्यता आहे. एप्रिल महिन्यामध्ये दक्षिण द्वीपकल्पातील अनेक भागात आणि उत्तर पश्चिम, मध्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागांत तापमानात मोठी वाढ दिसून येईल.