मुबंई- देशातील अनेक राज्यांमध्ये दसऱ्याच्या दिवशी हलका पाऊस झाल्याने, अनेक ठिकाणी दुर्गापूजा विसर्जन आणि रावण दहन कार्यक्रम विस्कळीत झाला. चीनी समुद्रातील नोरू या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवारे वाहत आहेत. हवेतील आर्द्रता वाढल्याने पाऊस पडत आहे. असेच वातावरण ऑक्टोबर मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
महाराष्ट्रासह अनेक राज्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने देशातील २० राज्यांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. या राज्यात मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.


