छायाचित्र ओळ : डावीकडून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, रवींद्र प्रभुदेसाई यांचा गौरव करताना विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक आणि विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l पुणे –
शनिवारी येथे पार पडलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना सन्माननीय डी.लिट.(विद्यानिधी) पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते प्रभुदेसाई यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणिती टिळक, प्रभारी कुलसचिव सुवर्णा साठे, विश्वस्त सरिता साठे यांच्यासह विविध विद्या शाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-अणसूर-गावात-३२-लाखांच्या/
पुण्यातील मुकुंद नगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संकुलात हा ४२ वा पदवीदान समारंभ भव्यदिव्य स्वरूपात पार पडला. ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे आणि कायनेटिक ग्रीन एजर्जी अँड पॉवर सोल्युशन्स लि.च्या संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया-मोटवानी यांनाही यावेळी डी.लीट.ने सन्मानित करण्यात आले. दीक्षांत समारंभात १२ विद्यार्थ्यांना पी.एच.डी. पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या १ हजार ६६ तर पदवी अभ्यासक्रमाच्या २ हजार ६८ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कौशल्य विकास शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या १४३ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सुवर्णपदके मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मागील ३५ वर्षांत उद्योगक्षेत्रात पितांबरीने उत्तुंग भरारी घेतली आहे.
आजमितीला अमेरिका, कॅनडा, ब्राझील, रशिया आणि ऑस्ट्रेलियासह २६ देशांमध्ये पितांबरीच्या उत्पादनांची विक्री होत आहे. उद्योगाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह समाजात अधिकाधिक मराठी उद्योजक तयार व्हावेत यासाठी पितांबरीचे प्रभुदेसाई मराठी तरुणांना विविध कार्यक्रमांतून मार्गदर्शन करत असतात. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. आध्यात्मिक वृत्तीचे रवींद्र प्रभुदेसाई विविध आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक संघटनांना वेळोवेळी साहाय्य करत असतात. उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या भरीव कार्याबद्दल आजतागायत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आले आहे. ‘उद्योग आणि शिक्षण यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. बुद्धयांक आणि संवेदना या गोष्टी जितक्या महत्वाच्या आहेत, तितकेच अध्यात्मिक अंगही महत्वाचे आहे. सच्चीदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे याविषयी मला मार्गदर्शन मिळाले. मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. मला मिळालेल्या या सन्मानाचा मी समाजासाठी वापर करीन’ असे उद्गार प्रभुदेसाई यांनी याप्रसंगी काढले.