🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई –
भारतीय नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षांशी जोडणारी ऐतिहासिक घटना घडली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडी या तीन महत्त्वपूर्ण नौकांचे राष्ट्रार्पण मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्रात-वैद्यकीय/
प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, भारत संपूर्ण विश्वाला एक कुटुंब मानत विकासाच्या दिशेने कार्यरत आहे. तीन आघाडीच्या लढाऊ नौकांचा नौदलात समावेश हा भारताच्या आत्मनिर्भरतेची अटल वचनबद्धता अधोरेखित करतो. भारतीय नौदलाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकांचे जीव वाचवत, मालवाहतूक सुरक्षित ठेवत भारताला एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून दिली आहे.
मोदी यांनी सांगितले की, या नौकांचे राष्ट्रार्पण केवळ सैन्य दृष्टिकोनातून नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. ‘मेक इन इंडिया’ योजनेतून संरक्षण सामग्रीचे उत्पादन वाढत असून १०० हून अधिक देशांना ही सामग्री निर्यात केली जात आहे. त्यामुळे भारताची आत्मनिर्भरता वाढली असून आर्थिक प्रगतीला चालना मिळाली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या ऐतिहासिक घटनेबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, एकाच वेळी तीन नौकांचे राष्ट्रार्पण होत असल्याने भारतीय समुद्री क्षेत्रात देशाचे सामर्थ्य आणि महत्त्व वाढले आहे. संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भरता यावर भर देण्यात येत असून या नौका आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.
नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी यांनीही हा दिवस भारतीय नौदलासाठी गौरवशाली असल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी नौदलाच्या सामर्थ्य, क्षमता आणि आत्मनिर्भरतेचा गौरव साजरा केला. या घटनेमुळे भारताने सागरी शक्तीच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून सागरी क्षेत्रातील भारताच्या सामर्थ्याचा नवा अध्याय सुरू होत असल्याचे नमूद करत, प्रधानमंत्री मोदी यांनी देशाच्या प्रगतीच्या या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल समाधान व्यक्त केले.