Maharashtra: मुलूंड येथे सोमवारी राज्य शिक्षक सेनेचे अधिवेशन

0
45
राज्य शिक्षक सेना,
मुलूंड येथे सोमवारी राज्य शिक्षक सेनेचे अधिवेशन

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई l शैलेश कसबे

ठाणे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अधिवेशन १० फेब्रुवारी रोजी मुंबई (मुलूंड) येथे होणार असून, या अधिवेशनाचे उ‌द्घाटन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याने सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र शिक्षक सेना ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन आर आर सभागृह म्हाडा वसाहत मुलुंड पूर्व मुंबई येथे १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वा. पर्यंत होणार आहे. या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहाणार आहेत, स्वागताध्यक्ष खासदार संजय दिना पाटील तर या अधिवेशनाचे अध्यक्ष शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार ज.मो. अभ्यंकर आहेत. प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते विनायक राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, सुनील राऊत ई उपास्थित राहाणार आहेत.

या अधिवेशनाला एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजेची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र शिक्षक सेनेचे ठाणे जिल्हा पदाधिकारी डॉ. संतोष गायकवाड, कुलदीप पाटील, भगवान गावडे, शुभांगी नीचीते, दिलीप चौधरी यांनी दिली आहे. या अधिवेशनातील प्रमुख मागण्या जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी, शिक्षणसेवक पद रद्द करावे, १५ मार्चचा जाचक संचमान्यतेचा जी.आर. रद्द करावा, टप्पा अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावे, जि.प.शाळेचे कंत्राटी धोरण व खाजगीकरण आदेश रद्द करावे, कला क्रीडा व कार्यानुभवासाठी आर.टी.सी. नुसार विशेष शिक्षकांचे पद निर्माण करावे, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, कंत्राटी शिक्षक भरती धोरण रद्द करावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस योजना लागू करावी आदी मागण्यांवर विचारविनिमय होणार आहे. या अधिवेशनास महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष व शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here