मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेमुळे चार रुग्णांचे वाचले जीव
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांना दिले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मा-श्री-अनिलजी-पवार-साहे/
मुंबईहून नागपुरला परतल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तात्काळ बाजारगावातील सोलर अर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन नागपुरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचे त्यांना समजले. याठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईकचालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी त्या ट्रकला एक वेगन आर कारही येऊन धडकली. त्यातही गाडीतले काही जण जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली, ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रकखालून बाहेर काढायला लावले. त्याचा पाय गंभीर जखमी असल्याने तत्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपुरातील रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले.
या तरुणाला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. गिरीश केशरावजी तिडके असे तरुणाचे नाव असून तो नागपूरच्या गोंड खैरीवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम (सिद्धार्थ नगरवाडी, नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (रा. रामबाग मेडिकल चौक नागपूर) आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे (रा. मौदा नागपूर) यांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षीत आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटूंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत.- श्री.विलास कोळी