Maharashtra: राजसिंग डुंगरपूर चषक क्रिकेट स्पर्धा :अवर्स क्रिकेट अकादमीला विजेतेपद; एल्टन सोरेस स्पर्धेत सर्वोत्तम

0
69
सी.सी.आय. आयोजित पहिल्या राजसिंग डुंगरपूर चषक या १५ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजेता ठरलेल्या अवर्स क्रिकेट अकादमी संघाचे छायाचित्र.
राजसिंग डुंगरपूर चषक क्रिकेट स्पर्धा : अवर्स क्रिकेट अकादमीला विजेतेपद; एल्टन सोरेस स्पर्धेत सर्वोत्तम

(विजय बने)

मुंबई, २८ एप्रिल :  सी.सी.आय.च्या वतीने आयोजित केलेल्या १५ वर्षाखालील मुलांच्या पहिल्या राजसिंग डुंगरपूर चषक क्रिकेट स्पर्धेत अवर्स क्रिकेट अकादमीने मुंबई क्रिकेट क्लबवर ७ विकेट्सनी मात करून विजेतेपदाचा मान मिळविला.  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा मुंबई क्रिकेट क्लबचा निर्णय आज त्यांच्याच अंगलट आला. अवर्स क्रिकेट अकादमीचा डावखुरा वेगवान गोलंदाज युवराज देसाई (९ धावांत २ बळी) आणि मध्यमगती गोलंदाज धैर्य शहा (९ धावांत २ बळी) या जोडीने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या मुंबई सी.सी.च्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सैफ खान (३८) याचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांना दोन आकडी धावाही करता आल्या नाहीत आणि त्यांचा डाव १९.४ षटकांत ७७ धावांतच संपुष्टात आला.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-पुलंच्या-तीस-कथा/

या आव्हानाचा पाठलाग करताना अवर्स क्रिकेट अकादमीचा फॉर्मात असलेला फलंदाज एल्टन सोरेस पहिल्या षटकातच बाद झाला. कार्तिक कुमारने त्याचा त्रिफळा उडविला आणि सनसनाटी निर्माण केली. मात्र या स्पर्धेत सातत्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमक दाखविणाऱ्या वेदांत  पाटील पाटील (नाबाद २८)याने संयमी फलंदाजी करीत एक बाजू लावून धरली. ३ बाद ४७ नंतर त्याने क्षितिज पाल (नाबाद २०) याच्या साथीने विजयासाठी आवश्यक ३२ धावांची अभेद्य भागीदारी करून संघाला विजयपथावर नेले. मुंबई सी.सी.च्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करीत प्रतिस्पर्धी संघाचा विजय १६व्या षटकापर्यंत लांबवला.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून एल्टन सोरेस (१५८ धावा) – (अवर्स ) याची तर स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून एजिस फेडरल वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या शतकवीर एकलव्य खाडे याची निवड करण्यात आली. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून कार्तिक कुमार आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून स्वनिक वाघदरे (दोघेही मुंबई क्रिकेट क्लबचे ) यांना गौरविण्यात आले.  भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, माजी अष्टपैलू कसोटी वीर करसन घावरी,  मुंबईच्या निवडसमितीचे सदस्य दीपक जाधव , सी.सी.आय.चे  क्रिकेट कमिटी सदस्य राजू परुळकर, सी.सी.आय.चे उपाध्यक्ष डी. मेहता, सचिन बजाज आदींच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.  यावेळी बोलताना वेंगसरकर यांनी विरारवरून येऊन या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या अवर्स क्रिकेट अकादमी संघाचे कौतुक केले. उपनगरात क्रिकेट बऱ्यापैकी वाढत असून तेथील उत्तम सोयी-सुविधांचा देखील त्यांनी उल्लेख केला. मात्र आता आगामी परीक्षांचा काळ लक्षात घेता या छोट्या खेळाडूंनी अभ्यासाकडे वळण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आणि खेळाबरोबरच शिक्षणाचे महत्व देखील अधोरेखित केले.

संक्षिप्त धावफलक –  मुंबई क्रिकेट क्लब – १९.४  षटकांत सर्वबाद ७७ (सैफ खान ३८; धैर्य शहा ९/२, युवराज देसाई ९/२) पराभूत वि. अवर्स क्रिकेट अकादमी – १६ षटकांत ३ बाद ७९ (वेदांत पाटील नाबाद २८, क्षितिज पाल नाबाद २०).

फोटो ओळी – सी.सी.आय. आयोजित पहिल्या राजसिंग डुंगरपूर चषक या १५ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजेता ठरलेल्या अवर्स क्रिकेट अकादमी संघाचे छायाचित्र. सोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, माजी अष्टपैलू कसोटी वीर करसन घावरी,  मुंबईच्या निवडसमितीचे सदस्य दीपक जाधव सी.सी.आय.चे  क्रिकेट कमिटी सदस्य राजू परुळकर, सी.सी.आय.चे उपाध्यक्ष डी. मेहता, सचिन बजाज आदी दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here