नागपूर : राज्यातील बसस्थानकेही विमानतळाप्रमाणे बांधून अद्ययावत करण्यात येतील व त्याची सुरुवात नागपूर बसस्थानकापासून करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विदर्भातील रेल्वे उड्डाणपुलांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमास दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपस्थित होते. महारेलच्या माध्यमातूनच ही बसस्थानके अद्ययावत करण्यात येतील तसेच महारेलमार्फत राज्यात येत्या वर्षभरात १०० रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार असून पुढील पाच वर्षात राज्यातील रेल्वेचा प्रवास फाटकमुक्त होईल असेही ते म्हणाले. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-जिल्ह्यातील/
महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे ( महारेल ) अजनी येथील पुलासह विदर्भातील नवीन सहा रेल्वे उड्डाणपुलांचे भूमिपूजन व सहा उड्डाणपुलांचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, आशिष जयस्वाल, राजू पारवे, टेकचंद सावरकर आदी मंचावर उपस्थित होते.
राज्यातील रेल्वे फाटक पुर्णपणे बंद करण्यासाठी राज्य शासनाला केंद्रातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, यासाठी राज्यात १२०० कोटींच्या २५ रेल्वे पुलांना आजच मंजूरी देण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली. यासोबत नागपूर शहरातील विविध विकास कामांसाठी ५०० कोटींच्या निधी मंजूरीची घोषणाही त्यांनी केली. यातून नागपूर हे जगातील चांगले पायाभूत सुविधा असलेले ‘मल्टीमॉडल हब’ म्हणून विकसित होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. देशात रेल्वे मार्ग तयार करणाऱ्या केवळ चार एनटीसी (न्यू ट्रॅक कन्स्ट्रक्शन) यंत्र आहेत. यापैकी एका यंत्राद्वारे इतवारी ते नागभिड रेल्वे मार्ग तयार करण्याच्या कामालाही आजपासून सुरूवात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महारेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायस्वाल यांनी प्रास्ताविक केले. मानसी सोनटक्के यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. रेल्वेचे महाप्रबंधक जितेंद्र कुमार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, शासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.


