मुंबई- राज्यात लवकरच ७५ हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भरतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी तसेच ती पूर्णपणे पारदर्शी असली पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यातील वर्ग-३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या पोलिसांच्या ७ हजार २३१ पदांना मान्यता देण्यात आली आहे. पोलिस महासंचालकांमार्फत भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. यासाठी मुंबईतील
२० मैदानांवर आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चाचणीच्या वेळी मैदानावर कॅमेरे लावले जाणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


