भगीरथ भालके राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत बीआर एस पक्षाचा झेंडा हाती घेणार, उद्या पक्ष प्रवेश
पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात पंढरपूरची जोरदार चर्चा रंगत आहे. विविध साखर कारखान्यांवर सत्ता मिळवणाऱ्या अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खुद्द पवारांनी पाटील यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके नाराज असल्याचं बोललं जात होतं. अखेर भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्रात-पाऊस-धुमा/
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव करून राज्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या दिवंगत आमदार भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत बीआर एस पक्षाचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या ते आपल्या सरकोली या गावात तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्या या पक्ष प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला पंढरपुरात सुरुंग लागला आहे.