मुंबई : इंदोर येथे झालेल्या ८५व्या यु.टी.टी. सब ज्युनिअर आणि कॅडेट गटाच्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने पहिल्यांदाच दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. 16 ते 24 जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत त्यांनी २ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली. गेल्या ८५ वर्षाच्या इतिहासात महाराष्ट्र संघाने पहिल्यांदाच राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक असणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षक जगदीप भिवंडकर यांनी महाराष्ट्राच्या या दमदार कामगिरीचे कौतुक करतानाच याचे सारे श्रेय हे खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, त्यांचे पालक आणि त्यांच्या शाळांच्या अधिकारी वर्गाना ज्यांनी त्यांना कायम पाठिंबा दिला, त्यांना असल्याचे सांगितले. या मुलांच्या यशामुळे भविष्यात त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असून यापुढे महाराष्ट्राला टेबल टेनिस मध्ये चांगले दिवस येतील असे म्हणायला हरकत नाही असे म्हटले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिरगांव-विकास-सेवा-सोसाय/
१५ वर्षाखालील मुलींच्या गटात दिव्यांशी भौमिक हिने अंतिम फेरीत ३-० अशा विजयासह सुवर्ण पदकाची कमाई केली तर काव्या भट्ट हिला मात्र याच गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. याच वयोगटातील दुहेरीत दिव्यांशी भौमिक आणि काव्या भट्ट जोडीने तामिळनाडूच्या एम. हंसिनी आणि अनन्या एम. या बलाढ्य जोडीला ३-१ असे नमवून सुवर्ण पदकावर नाव कोरले.
१५ वर्षाखालील मुलींच्या गटातील सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. बलाढ्य तामिळनाडू संघाने त्यांना ३-२ असे हरविले. महाराष्ट्राच्या मुलींनी उपांत्य पूर्व फेरीत तेलंगणा संघावर ३-० असा विजय मिळविला होता तर गतविजेत्या दिल्ली संघाला उपांत्य फेरीत ३-२ असे पराभूत केले होते.
१३ वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या नाईशा रेवस्कर हिला अंतिम फेरीत बंगालच्या अहोना रॉय हिच्याविरुद्ध १-३ असा पराभवाचा सामना करावा लागल्याने तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर १५ वर्षाखालील मुलींच्या गटातील दुहेरीत नाईशा रेवस्कर आणि सान्वी पुराणिक जोडीने कांस्य पदकाची कमाई केली.