मुंबई- बऱ्याच वर्षांपासून रखडलेली विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती लवकरच होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी अनाैपचारिक चर्चा करताना ही माहिती दिली.राज्यपालांना विधान परिषदेवर १२ आमदार नियुक्त करण्याचा अधिकार असतो. मात्र, त्यासाठीची शिफारस राज्य मंत्रिमंडळ करत असते. भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने १२ सदस्यांच्या नावांची शिफारस कोश्यारी यांच्याकडे केली होती. पण कोश्यारी यांनी शेवटपर्यंत त्या नियुक्त्या केल्या नाहीत. नियुक्तीची शिफारस राज्य सरकार करू शकते पण त्या कधी कराव्यात याविषयी कायद्यात स्पष्ट तरतूद नाही. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-जिल्ह्यातील-10/
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आणि तेव्हाचे राज्यपाल कोश्यारी यांच्यात अनेक मुद्यांवर मतभेद झाले. त्यावेळच्या मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या नावांची नियुक्ती होऊ शकली नव्हती. नंतर हे प्रकरण न्यायालयातही गेले, आताही ते न्यायप्रविष्ट आहे. अजित पवार यांनी सांगितले, की महायुतीत १२ पैकी किती जागा कोणाला मिळतील हे अद्याप ठरलेले नाही पण ३१ ऑगस्टपर्यंत या नियुक्त्या होतील, असा आम्हाला विश्वास आहे. सूत्रांनी सांगितले की ६-३-३ असा फॉर्म्युला ठरू शकतो. भाजपला ६ आणि शिंदे सेना व अजित पवार गटाला ३ आमदारकी मिळतील, असे मानले जाते. विधानसभेला आपल्या पक्षातर्फे मुस्लीम उमेदवार उभा करणार का, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की आम्ही मुस्लीम उमेदवार देऊ. विधान परिषदेत आज एकही मुस्लीम आमदार नाही. या १२ सदस्यांमध्ये आमच्यातर्फे एका मुस्लीम व्यक्तीला संधी दिली जाईल.
विधान परिषदेचे संख्याबळ ७८ आहे. त्यातील २७ जागा रिक्त आहेत. त्यात राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा समावेश आहे. या शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपल्याने या संस्थांमधून विधान परिषदेवर सदस्य निवडून पाठवायची प्रक्रियाच खोळंबली आहे. अशा १५ जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून २२ आमदार विधान परिषदेवर निवडून जातात. त्यातील फक्त ७ जागा भरलेल्या आहेत.