नांदेड- महागाईविरोधात आंदोलन करणं शिवसैनिकांना चांगलचं महागात पडलंय. कोर्टाने 19 जणांना तब्बल 5 वर्षांची तुरुंगवास आणि 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
2008 साली नांदेडमध्ये शिवसेनेने महागाई विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलना दरम्यान काही बसेस वर दगडफेक करण्यात आली होती. शिवाय दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणात एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पत्रकाराला-लागला-डान्स/
जखमी झालेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. जिल्हा सत्र न्यायाधीश एस ई बांगर यांनी सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा ठोठावली. यात महत्त्वाचे म्हणजे कलम 353 अंतर्गत 2 वर्षांची शिक्षा आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्येकी 1 लाख 60 हजार 750 असा एकूण 30 लाख 54 हजार 250 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आरोपींमध्ये तत्कालीन आमदार अनुसाया खेडकर, त्यांचा मुलगा महेश खेडकर, शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, माजी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील सह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने सर्व आरोपींची रवानगी कारागृहात होणार आहे. नांदेड न्यायालयाने अश्या प्रकरणात आरोपींना 5 वर्षांची शिक्षा आणि एव्हढा मोठा दंड आकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रीया आरोपींच्या वकिलांनी दिली.


