मुंबई, ७ डिसेम्बर : महाविद्यालयीन खेळाडूंना उच्च स्तरावर खेळण्यासाठी तयार करणारे, झुनझुनवाला महाविद्यालयात ३५ वर्षे क्रिकेट प्रशिक्षणाच्या कार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या गुरुवर्य हेमू दळवी सर यांना त्यांच्या शिष्यानी आगळी गुरुदक्षिणा दिली. चार कसोटीपटू, ४० रणजीपटू आणि ११ उच्च दर्जाचे राष्ट्रीय प्रशिक्षक घडविणारे हेमू दळवी हे गेले चार -पाच महिने मूत्राशयाच्या विकाराने आजारी असून दिवसातून तीन वेळा त्यांना डायालीसीस करावे लागत आहे. ही गोष्ट कळताच त्यांचे शिष्य व भारताच्या १९८३च्या विश्वचषक विजेत्या संघातील शिल्पकार बलविंदर सिंग संधू, रणजीवीर रवी ठक्कर, अरविंद धुरी, प्रमोद साटम, मनोज गट्टी, उदय केळुस्कर या सर्वानी सरांच्या आपल्यावर घेतलेल्या मेहनतीचे ऋण फेडण्याचा चंग बांधला. त्यांनी झुनझुनवालाच्या उषा मुकुंदन मॅडम यांच्या पुढाकाराने आपल्या कॉलेजच्या अन्य क्रिकेटपटूना संपर्क करून त्यांना याची माहिती दिली आणि बघता बघता जवळपास ५० -५५ माजी क्रिकेटपटूंनी हेमू दळवींना गुरुदक्षिणा देण्याच्या संकल्पनेत आपला हातभार लावला. या सर्व खेळाडूंनी सरांच्या कांदिवली येथील निवासस्थानी त्यांना भेट दिली. यावेळी सरांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी देखील हजर होती. दळवी सरांप्रती त्यांच्या माजी शिष्याना असलेली तळमळ पाहून ते देखील भारावले होते.
बऱ्याच वर्षानंतर आपल्या माजी शिष्याना पाहून हेमू दळवी खूपच उत्साहित झाले होते. आपण एवढ्या वर्षात खरोखरच चांगले खेळाडू आणि त्याच बरोबर त्यांच्यात चांगली माणुसकी निर्माण करण्यात यशस्वी ठरलो याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. आज मला शांत झोप लागेल असे ते सर्वाना आवर्जून सांगत होते आणि सर्वांबरोबर पुन्हा एकदा क्रिकेटच्या गप्पात ते रंगून गेले. दळवी सरांचे अजून एक शिष्य पारस महाम्बरे हे सध्या भारतीय संघासह बांगला देश दौऱ्यावर असल्याने ते सरांच्या भेटीला येऊ शकले नाहीत पण आपल्या शुभेच्छा त्यांनी आवर्जून पाठविल्या होत्या. सरांचे नातलग उमेश साळगावकर, दिलीप वालावलकर हे देखील यावेळी उपस्थित होते. दळवी सरांच्या मुलीने आणि जावयाने उपस्थित सर्व खेळाडूंचे आदरातिथ्य केले. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे सरांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांचे आयुष्य नक्कीच वाढविणारा ठरेल असे ते सर्वाना सांगत होते.