पुणे- शालेय पोषण आहार योजनेचे नाव बदलून ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना‘ हे नाव दिल्यानंतर आता शालेय पोषण आहारासाठीच्या अनुदानाच्या रक्कमेतही वाढ करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरात ९.६ टक्के दरवाढ मंजूर केली आहे.
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत (पूर्वीची शालेय पोषण आहार) २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून अन्न शिजविण्याच्या दरात १०.९९ टक्के वाढ करण्याचे आदेश केंद्र सरकारने १४ एप्रिल २०२० रोजी दिले होते. त्यानुसार २४ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयाद्वारे अन्न शिजविण्याच्या दरासाठी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी (प्रति विद्यार्थी प्रतिदिन) ४ रुपये ९७ पैसे आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी ७ रुपये ४५ पैसे निश्चित केली आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-मोहन-भोई-वेंगुर्ला-पंचा/
परंतु, आता केंद्राच्या ७ ऑक्टोबर २०२२ च्या आदेशानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता १ ऑक्टोबर २०२२ पासून अन्न शिजविण्याच्या दरात ९.६ टक्के दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार, प्रति विद्यार्थी प्रतिदिन याकरिता प्राथमिक वर्गासाठी ५ रुपये ४५ पैसे आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी ८ रुपये १७ पैसे हा सुधारित दर ठरविण्यात आला आहे. शालेय पोषण आहार योजनेचे नाव बदलून आता ते ‘प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना‘ असे केले आहे. योजनेचे नाव बदलल्यानंतर अनुदानात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे इंधन आणि भाजीपालासाठी मिळणाऱ्या अनुदानात काही प्रमाणात वाढ जाहीर केली आहे. परंतु, खाद्य तेल आणि इंधनाचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे त्याआधारे योजनेत वेळोवेळी सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच योजनेअंतर्गत काम करणारे स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या मानधनातही समाधानकारक वाढ होणे आणि ते दरमहा वेळेवर मिळणे महत्त्वाचे आहे. मुळात तुटपुंज्या मानधनामुळे या कामासाठी कोणीही तयार होत नसल्याचे वास्तव आहे.