सिंधुुदुर्ग- अभिमन्यू वेंगुर्लेकर –
महायुती सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. खास महिलांसाठी “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात आली. यानंतर आता राज्य सरकारने ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा केली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग(एसईबीसी) आणि इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात 50 टक्के सूट होती. आता या शुल्कात सरकराने 100 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या 100 टक्के सूट देण्याच्या निर्णयाने विद्यार्थिंनींना मोठा दिलासा मिळाला आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या ओबीसी मुलींना फी माफी देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी यंदाच्या बजेटमध्ये केली. केवळ मेडिकलच नाही तर अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ अशा विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थिनी याचा फायदा होणार आहे. आज (शनिवारी) याबाबतचा GR निघणार आहे. GR जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित महाविद्यालये, अशासकीय अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस, शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी, ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या विद्यार्थिनींना हा लाभ मिळणार आहे.