मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, झोपलेल्या शासन प्रशासनाला जाग करण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करुन झाली तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. ‘नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाली, त्यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त होते. परंतु आता महिना होवून गेला तरी शेतकऱ्यांना कोणतीही ठोस मदत मिळालेले नाही, सरकारने आजच्या बैठकीत निर्णय घ्यावा.’ असे मत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-परतीच्या-पावसाने-केला-कह/
या मोर्चाचे संयोजन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव पाटील देवसरकर यांनी केले. मोर्चासाठी पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, सदा पुयड, तिरुपती भगमुरे, अवधूत पाटील, बालाजी कराळे, बालाजी धोंडे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. शेतकरी आसूड मोर्चाच्या मागण्या खालीलप्रमाणे : १. सोयाबीनला सरासरी रू.8,500 प्रति क्विंटल, कापसाला सरासरी रू.11,000 प्रति क्विंटल आणि ऊसाला प्रति टन रू.3,500 दर देण्यात यावा. २. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानाची भरपाई 72 तासांत तातडीने वितरण करण्यात यावी, ज्याचे आश्वासन शासनाने दिले होते. ३. नदीकाठच्या शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान देण्यात यावे, कारण या शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झाले आहे. ४. ज्या शेतकऱ्यांची घरे पडली आहेत, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेनुसार रू.3 लाख रक्कम तातडीने मिळावी ५. बैल, म्हैस किंवा इतर प्राण्यांचे नुकसान झाल्यामुळे त्यासाठी तातडीने मोबदला दिला जावा. ६. ज्या शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य व अनुदान तातडीने दिले जावे. ७. ज्या भागात पाणी साठते, तेथे उंच पुलांची बांधणी करण्यात यावी. ८. 100% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करण्यात यावे. ९. ज्या शेतकरी बांधवांच्या घरी लग्न ठरलेले आहे, अशा शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाचा खर्च कन्यादान योजनेतून शासनाने उचलावा. १०. 100% नुकसान झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने परीक्षा शुल्क माफ करावे आणि प्रवेश शुल्क परत करावे. ११. नुकसान भरपाई बँक खात्यात जमा झाली आहे, परंतु बँकांनी खाते होल्ड केले आहे. हे होल त्वरित उठवण्यात यावे.