मुंबई- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पानंतर रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात ‘स्मार्ट सिटी’ नव्हे तर ‘स्मार्ट व्हिलेज’ची गरज असल्याचं सांगितलं. पुण्यात आयोजित ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ सोहळ्यात गडकरी पुढे म्हणाले की, कृषी क्षेत्राला जल, जमीन, जंगलच्या आधारावर नवीन तंत्रज्ञान दिलं तर खूप काही करण्यासारखं आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राष्ट्रीय-अन्न-सुरक्षा/
नितीन गडकरी म्हणाले की, “शेतकरी हा केवळ अन्नधान्याचा उत्पादक राहिलेला नसून तो ऊर्जादाता च्या भूमिकेतही शिरला आहे. कृषी क्षेत्रात देखील अनंत संधी दडलेल्या आहेत. आपली इंधनाची सध्याची आणि भविष्यातली देखील गरज भागवण्याची क्षमता कृषी उद्योगात आहे. ग्रामीण भागाच्या गरजा आणि गरजवंतांचा मानवी चेहरा केंद्रस्थानी ठेवून संशोधन करत तंत्रज्ञानाचा विकास झाल्यास, ग्रामीण भागातून येणारे लोंढे गावातच थांबतील. त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील”. कृषी आणि ग्रामीण भागाचा जीडीपी केवळ पंधरा ते सोळा टक्के आहे. ते योगदान वाढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देणे आपल्याला शक्य आहे. कृषी उद्योगाला ऊर्जा निर्मितीचाही पर्याय दिल्यास अधिक क्षमतेने प्रगती करता येईल, असा आपल्याला विश्वास असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समोर ठेवलेल्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी निर्यात वाढवून आयात कमी करावी लागेल. इथेनॉल, बायोइथेनॉल आदी पर्यायांचा वापर करून पेट्रोल आणि डिझेलसाठी होणारा खर्च आपण वाचवू शकतो. तो पैसा देशाच्या इतर विकासाच्या कामात उपयोगात आणू शकतो. स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्य हा आपल्या प्रगतीचा मूलमंत्र असला पाहिजे. ‘स्मार्ट सिटी’ सोबतच ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना अस्तित्वात आणावी लागेल. सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतर हे संशोधनाचं आणि तंत्रज्ञानाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे असं यावेळी गडकरी म्हणाले.