आठ दिवसात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता
मुंबई, (विशेष प्रतिनिधी) :
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक येथील निवासस्थानी घेतलेली भेट व सुमारे दीड तास झालेली चर्चा यामुळे राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होणार असल्याची शक्यता असल्याने लवकरच राज्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. शरद पवारांचा प्लॅन बी काय असेल? याबाबत देखील उत्सुकता असून येत्या आठ दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-पावशी-येथे-भूमिपूजन-कार्/
राज्यात सुमारे दहा महिन्यापूर्वी शिवसेनेत फूट पडल्याने सत्तेतून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले होते. विरोधी पक्षात बसलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी ‘बी प्लॅन’वर काम करत असल्याची गोपनीय माहिती राजकीय निरीक्षकांकडून चर्चिली जात आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भाजप पक्षासाठी घेतलेली अनुकूल भूमिका हा त्याचाच भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पवार याचे खंडन करत असले तरी मित्रपक्षांना मात्र त्यांच्या खेळीची धास्ती वाटतेय. त्यातच शरद पवार जे बोलतात, बरोबर त्याच्या विरोधात त्यांची भूमिका असते. यापूर्वी सावरकरांच्या मुद्द्यावर पवारांनी राहुल गांधींचे कान टोचले, आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडताना आम्हाला विचारले नव्हते, अशी वक्तव्ये करून पवार आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आणत आहेत.
त्यातच माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरील अटकेची टांगटी तलवार तर दुसरे राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक जेलमध्ये आहेत. नुकतेच जामीनावर सुटलेले माजी मंत्री अनिल देशमुख व पवार यांचे पुतणे व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर देखील अधून मधून भाजपकडून होणारे आरोप, या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांची अलीकडली वक्तव्य पाहता ते भाजपला अनुकूल असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे पवारांचे लक्ष?
‘नागालँड पॅटर्न’ची आता महाराष्ट्रात पुनरावृत्ती शक्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सुप्रीम कोर्ट याबाबत लवकरच निर्णय देईल. जर हे आमदार अपात्र ठरले तर शिंदेंना मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल. तसेच युतीचे संख्याबळ घटेल. अशा परिस्थितीत अडचणीत येणाऱ्या भाजपला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे येऊ शकते. अशावेळी राष्ट्रपती राजवट लागण्यापेक्षा राज्यात भाजपासोबत जाऊन देवेंद्र फडणवीस यांना सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचवण्याची शक्यता राज्यात निर्माण झाली आहे
फडणवीसांना मुख्यमंत्री बनवून शिवसेना, राष्ट्रवादी सत्तेत राहतील.?
नागालँडमध्ये भाजप व एनडीपीपी यांना राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. त्याची पुनरावृत्ती राज्यात होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोरलयमध्ये असणाऱ्या 19 बंगल्यांच्या प्रकरणावरन शिवसेनेचे तेथील माजी तालुकाप्रमुख यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात संशयाची सुई उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापर्यंत जात असल्याची भीती उद्धव ठाकरे यांना घालून भाजपा त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याची शक्यता असल्याची भाजपाच्या गोटात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यसभेचे खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी, अदानींच्या जेपीसी चौकशीसाठी काँग्रेस व उद्धव सेना आक्रमक असताना पवारांनी ते अयोग्य ठरवून भाजपधार्जिणी मते मांडली.
उद्धव ठाकरे अस्वस्थ?
भाजपला अनुकूल वक्तव्ये करणाऱ्या शरद पवारांच्या खेळीमुळे अस्वस्थ झालेले उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्रीच ‘सिल्व्हर ओक’वर धाव घेतली. तिथे उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे व संजय राऊत या चौघांमध्ये सुमारे सव्वा तास खलबते झाली. यातील चर्चेचा तपशील गोपनीय असला तरी चर्चेचा अजेंडा वादग्रस्त मुद्द्यांबाबतचाच असल्याची माहिती दोन्ही पक्षांतील अंतर्गत गोटातून मिळते आहे.
विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेसचा सहभाग नव्हता. राज्यात मविआच्या सात वज्रमूठ सभा होणार आहेत. यापैकी दुसरी सभा १६ एप्रिलला नागपुरात होईल. त्या सभांमधून आघाडीची एकसंघ भूमिका दिसायला हवी. मतभिन्नता निर्माण होणारे विषय टाळायला हवेत, अशी अपेक्षा ठाकरेंकडून व्यक्त करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पहिल्या वज्रमूठ सभेत झालेल्या चुका यापुढे टाळण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही चर्चा झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सभांपासून दूर राहत आहेत. यासंदर्भात शरद पवारांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना बोलावे, अशी गळ उद्धव ठाकरेंनी घातली असल्याची माहिती मिळते आहे.
सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांसह विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र होणार अशी शक्यता वाढल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खात्याच्या प्रलंबित असणाऱ्या नसतींवर तातडीने निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आठ दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणे अपेक्षित असून त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचे मत राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केले जात आहे