मुंबईत उकाडा कायम
मुंबई:– राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काही भागांत गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह बऱ्याच ठिकाणी उकाड्यामध्ये प्रचंड वाढ होत आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-ज्येष्ठ-नागरिकांना-मिळण/
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. जळगाव जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये वादळ आणि गारपिट झाली आहे.
तापमानामध्ये देखील वाढ होत आहे. उकाड्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांताक्रुझ येथे काल तब्बल ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात प्रचंड उकाडा जाणवत आहे. हे उष्ण वारे अरबी समुद्रावरुन महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्द्रता प्रचंड वाढली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर मुंबईमध्ये उकाडा कायम आहे.