⭐वार्षिक वेळापत्रक CBSE प्रमाणे आखण्याची शिफारस
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/मुंबई/25 ऑक्टोबर
राज्य मंडळाच्या शाळांच्या परीक्षा आता सीबीएसईप्रमाणेच मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच एप्रिलमध्ये नव्याने शाळा सुरू होऊन मेमध्ये सुट्टी देण्याची तयारी सुरू आहे. राज्याचा अभ्यासक्रम आराखडा नुकताच जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शैक्षणिक वेळापत्रकाप्रमाणे राज्यातही शैक्षणिक वेळापत्रक लागू करण्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-आजपासून-चिपी-मुंबई-विमा/
त्यानुसार, मार्चमध्ये परीक्षा संपवून एप्रिलमध्ये पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येईल आणि मे महिन्यात उन्हाळी सुट्टी देण्यात येईल. मे महिन्याच्या सुट्टीतही विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जाणार असून जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू होईल.
राज्याच्या शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाची दिशा ठरवणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर झाला असून, यामध्ये शाळांचे वार्षिक वेळापत्रक ‘सीबीएसई’प्रमाणे आखण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस मान्य झाली, तर लवकरच राज्यातील सर्व शाळांमधील शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होईल.
राज्यातील सर्व शासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये लवकरच सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम राबवला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. त्या अनुषंगाने शाळांचे वार्षिक वेळापत्रकही सीबीएसई शाळांप्रमाणेच आखण्याची शिफारस नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात करण्यात आली आहे. या शिफारशीबाबत राज्य शिक्षक, मुख्याध्यापक संघटना हरकत नोंदवण्याची शक्यता आहे.