Majharashtra: ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे माजी अध्यक्ष कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर यांचे दुःखद निधन

0
69
ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे माजी अध्यक्ष कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर यांचे दुःखद निधन
ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे माजी अध्यक्ष कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर यांचे दुःखद निधन

मुंबई: कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर  एक चालते बोलते विद्यापीठ आज निशब्द झाले ! ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे माजी अध्यक्ष कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर यांचे दिनांक आठ एप्रिल रोजी अल्पशा आजारात शुश्रूषा इस्पितळात वयाच्या 81 व्या वर्षी दुःखद निधन झाले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurrg-बी-एस-एन-एल-चा-टाॅवर-असुनह/

पद्मश्री प्रेमा पुरव यांनी स्थापन केलेल्या अन्नपूर्ण संस्थेचे ते अध्यक्ष होते. या संस्थेद्वारे प्रामुख्याने अल्प उत्पन्न गटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून जाते तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. या संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या “संवाद” या मासिकाचे ते संपादक होते.  याशिवाय मुंबईस्थित श्रमिक प्रतिष्ठानचे ते विश्वस्त होते.  कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव होता. त्यामुळेच ते सुरुवातीला गिरणी कामगारांच्या चळवळीकडे आकृष्ट झाले.  वयाच्या विसाव्या वर्षी १९६२ मध्ये महाराष्ट्र बँकेत ते रुजू झाले. तेव्हापासून बँक कर्मचारी चळवळीचा ते अविभाज्य भाग बनले.  मध्यमवर्गीय बँक कर्मचाऱ्यांना संघटीत करण्यात, त्यांना समग्र कामगार चळवळीचा भाग बनविण्यात, त्यांच्यात वर्गीय जाणिवा निर्माण करण्यात, त्यांच्यात प्रगत, पुरोगामी विचार रुजविण्यात त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.

बँक कर्मचारी चळवळीत काम करत असताना सुरुवातीला बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे यासाठी त्यांनी जनमत संघटित केले. नंतर राष्ट्रीयीकृत बँकिंग उद्योगाचे संचलन नीट करण्यात यावे, या बँकांनी जन केंद्रित धोरणे राबविली जावीत यासाठी ते सतत झटले. राष्ट्रीयीकृत बँकिंग उद्योगातून कार्यसंस्कृतीत सुधारणा व्हावी, ग्राहक सेवेबाबत बँक कर्मचाऱ्यांनी संवेदनशील राहावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. कामगार संघटना म्हणून जबाबदार भूमिका घ्यावी, चुकीच्या धोरणावर कठोर टीका करत असतानाच पर्यायाबद्दल सतत ते आग्रही असत.  वयाच्या तिसाव्या वर्षी महा बँकेच्या संचालक मंडळावर कर्मचाऱ्यांची प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी, महाराष्ट्र राज्यातील सर्व बँकातील कर्मचारी, देशभरातील ग्रामीण बँकातील कर्मचाऱ्यांना संघटित करण्यात त्यांचे योगदान मोलाचे होते. देशातील सगळ्यात मोठे राज्य निहाय बँक फेडरेशन, महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉइज फेदरेशनचे ते अनेक वर्ष सरचिटणीस होते तर अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे ते प्रथम जॉईंट सेक्रेटरी नंतर सेक्रेटरी व अखेर अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.  या काळात बँक कर्मचाऱ्यांना पगार वाढ, पेन्शन मिळवून देण्याच्या अनेक करांराना आकार देण्यात त्यांचे योगदान मोठे होते.  १९८४ साली बँकिंग उद्योगात यांत्रिकीकरणचा पहिला करार झाला. यानंतर १९८७ व १९८९ मध्ये त्याचा विस्तार करणारे करार झाले.  या सर्व करारांना आकार देण्यात, कर्मचाऱ्यांची हित जोपासत आधुनिक तंत्रज्ञान बँकिंग उद्योगातून कार्यान्वित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

बँक कर्मचारी चळवळीत काम करत असतानाच बँक, विमा, वीज, राज्य सरकारी कर्मचारी संघटनात समन्वय ठेवत व्यापक एकजूट उभी करण्यात ते सतत क्रियाशील असत. या सर्व संघटनात समन्वय साधत राज्यात त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले.  नवीन आर्थिक धोरण, खाजगीकरण, उदारीकरण याच्या विरोधात अनेक लढे उभारले, जनमत संघटित केले. एनरॉन च्या विरोधातील लढ्यात ते अग्रेसर होते. 

नैसर्गिक आपत्ती जशि की भूकंप, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ यात बँक कर्मचाऱ्यांनी पुढाकाराने मदत केली पाहिजे म्हणून ते सतत आग्रही असत.  त्यातूनच किल्लारी भूकंपानंतर लातूर जिल्ह्यातील गांजणखेडा या गावात बँक कर्मचाऱ्यांच्या योगदानातून भूकंपग्रस्तांसाठी एक वसाहत उभी करण्यात आली. १९७१ च्या दुष्काळात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिकलठाण या गावात विहीर खोदली गेली. 

बँक कर्मचाऱ्यानी समाज उपयोगी कामे हाती घ्यावीत यासाठी ते सतत प्रयत्नशील असत, कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर एक चतुरस्त्र वक्ते होते. एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते.  कुठल्याही विषयाची मांडणी करताना ते जागतिक परिप्रेक्ष्यातून या विषयाची मांडणि करत असत तसेच त्यांची मांडणी नेहमीच वस्तुनिष्ठ असे.  बँक कर्मचारी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांच्या जडणघडणीत त्यांचा सहभाग मोठा होता. चळवळीशी संबंधित विषयावर पुस्तिकांचे प्रकाशन, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे आणि विविध प्रश्नावर उभारण्यात आलेले लढे यातून त्यांनी महाराष्ट्र राज्यातून बँक कर्मचारी चळवळीतील अनेक कार्यकर्ते घडवले, त्यांना एक व्यापक दृष्टी मिळवून दिली आणि म्हणूनच आज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील बँक कर्मचारी संघटना नेहमीच लढाऊ, अग्रेसर, क्रियाशील दिसतात.  बँक कर्मचारी चळवळीसाठी  वयाच्या ८२ व्या वर्षी देखील ते मार्गदर्शक होते, तत्त्वज्ञ होते, मित्र होते, स्फूर्तीस्थान होते, आदर्श होते.  कार्यकर्त्यांसाठी ते एक चालते बोलते विद्यापीठ होते.  आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत ते बँक कर्मचारी चळवळीला दिशा देण्यासाठी, कार्यकर्ते घडविण्यासाठी ते झटत राहिले आणि म्हणूनच खर्‍या अर्थाने बँक कर्मचारी चळवळीसाठी कार्यकर्त्यांसाठी ते चालते बोलते विद्यापीठ होते ! 

९ एप्रिल, २०२३ रोजी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी आयोजित शोकसभेत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू राज्यसभेचे माजी सदस्य डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस चे प्राध्यापक संजीव चांदोरकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो अन्नपुर्णाच्या डॉक्टर मेघा सामंत, एआयबीईएचे जॉईंट सेक्रेटरी कॉ. देवीदास तुळजापूरकर, एआयबीओएचे जनरल सेक्रेटरी एस. नागराजन इत्यादींनी आपल्या भावना व्यक्त करत कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांना अखेरचा लाल सलाम  केला !

याप्रसंगी विविध मध्यवर्ती कामगार संघटनांचे कार्यकर्ते, बँक कर्मचारी चळवळीतील कार्यकर्ते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here