रत्नागिरी- राज्यात सर्वत्र पोलीस भरती सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना या भरतीत प्राधान्य द्यावे अशी मागणी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे माजी खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-अर्जुन-रावराणे-विद्याल/
निलेश राणे यांनी पत्रात म्हंटले आहे की,कोरोना कालखंडानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदासाठी भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यात पोलीस शिपाई पदांच्या १३१ जागा भरायच्या आहेत. या भरती प्रक्रियेतील पहिला आणि महत्वाचा टप्पा असलेली मैदानी चाचणी नुकतीच पार पडली. या १३१ जागांसाठी राज्यभरातून ७ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आणि चाचणीमध्ये ४ हजारांहून अधिक उमेदवार निवडले गेले. इथला तरुण वर्ग मोठ्या संख्येने मुंबई व अन्य महानगरांकडे वळत आहे. असे असताना शासकीय सेवेत नोकरीची संधी त्याच्या जिल्ह्यातच उपलब्ध होत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे घोषित केले आहे. ही संधी रत्नागिरीतील युवकांना या पोलीस भरतीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या पोलीस भरती प्रक्रियेत जास्तीतजास्त स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे.