रत्नागिरी- वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी प्रभावी ठरलेल्या जपानी मियावाकी तंत्राचा जिल्ह्यातील पहिला प्रस्ताव बनवण्यात आला असून, नाणीज-खानू देवराईजवळ सुमारे १० गुंठे जागेवर देशी-विदेशी नाही तर स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहेत.१६ लाखांचा हा प्रस्ताव असून, सामाजिक वनीकरण विभागाने तो मंजुरीसाठी प्रशासनाला सादर केला आहे. कमी जागेत उभारणार घनदाट जंगल ऊभारण्याची ही पद्धत आहे. ही झाडे एकमेकांशी स्पर्धा करत नसल्याने तेथे दाट झाडी तयार होते.
राज्यात मुंबईसह जालना, औरंगाबाद, पुणे, जळगाव, नांदेड जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर जपानी मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून घनदाट वृक्षलागवड केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सागरी भागात असलेली खारफुटीची जंगले नष्ट होऊ लागली असून, तेथे सिमेंट काँक्रिटचे बांधकाम होऊ लागले आहे. काही ठिकाणच्या भागात असलेला हरितपट्टाही अतिक्रमणामुळे नष्ट होऊ लागला आहे. यावर मात करण्यासाठी आता प्रशासनाने जपानी पद्धतीचे ‘मियावाकी’ तंत्रज्ञान वापरून वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.


