दापोली– अंधश्रद्वांची होळी करुया!, जातीभेदांची होळी करुया!, द्वेषभावनांची होळी करुया! अशा घोषणा देत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकताच शाळेत होळीचा सण साजरा केला.
होळीपौर्णिमेनिमित्त शाळेत होळीच्या सणाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय परिसरातील कचरा, पालापाचोळा व गवत गोळा करून मुलांनी होळीचा सण साजरा केला. शाळेतील शिक्षकांच्या देखरेखीखाली मुलांनी होळीच्या सणाचे आयोजन केले होते. यावेळी शाळेतील शिक्षकांनी पर्यावरणपुरक होळी, होळीच्या सणामागची भावना, होळीचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले.
शाळेतील शिक्षक रिमा कोळेकर, अर्चना सावंत, मानसी सावंत, बाबू घाडीगांवकर, मनोज वेदक यांनी यावेळी विद्यार्थ्यांना होळीच्या सणाचे महत्त्व पटवून सांगितले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.