मुंबई- रत्नागिरी जिल्हयातील परशुराम घाट येथील दरडी कोसळण्याच्या प्रकारांमुळे ज्या गावांमधील घरांना धोका निर्माण झाला आहे व जी घरे घाटाच्या माथ्यावर व पायथ्याशी आहेत, त्या गावांमधील अनेक घरांमधील कुटुंबियांना लवकरात लवकर पर्यायी ठिकाणी स्थलांतरीत करुन त्यांचे अकरा महिन्यात पुन्हा त्यांच्या राहत्या जागेत पुनर्वसन करुन ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विभागाच्या अधिका-यांना दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांच्या आढावा बैठकीत बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, परशुराम घाट परिसरातील कुटुंबियांना रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु केल्यास दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे व मुरुमामुळे घरे खचण्याचीही भीती निर्माण झाली आहे. यामुळे येथील रस्ते रुंदीकरणाच्या कामामध्ये काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम करताना या परिसरातील कुटुंबियांना योग्य भाडे देऊन त्यांना पर्यायी जागेत स्थलांतरित करावे. या दरम्यानच्या काळात रस्ता रुंदीकरणाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करुन ११ महिन्यांच्या कालावधीत येथील स्थलांतरित कुटुंबियांचे पुन्हा त्याच जागी पुनर्वसन करण्याची सूचनाही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
परशुराम घाटाच्या रुंदीकरणाचे काम विभागाने नजिकच्या काळात व एका विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण ताकदीने पूर्ण करावे असेही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.


