Ratnagiri: ‘मनमुक्त’मध्ये माहेरवाशिणीच्या येण्याने फुलले आंगण!

0
134

मुंबई l अनुज केसरकरः
पाली येथून जवळच असणाऱ्या पिवरे येथे ‘मनमुक्त’ फाऊंडेशन माहेरवाशीण महोत्सव आयोजित केला जातो.या महोत्सवाची वाट सर्व माहेरवाशिणी अगदी आतुरतेने बघत असतात. वर्ष कधी संपते आणि ‘मनमुक्त’च्या माहेरवाशीण महोत्सवात आपण सहभागी होतो, अशी आस लागून राहिलेल्या माहेरवाशिणीने अखेर पालीजवळचे पिवरे गाव गाठलेच. माहेरवाशिणीच्या येण्याने ‘मनमुक्त’चे आंगण कमालीचे फुलले. ‘मनमुक्त’ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या ‘माहेरवाशीण महोत्सवात’ राज्याच्या अनेक भागांतून महिला सहभागी झाल्या होत्या.

दर वर्षी राज्यातील अव्वल असणाऱ्या ‘माहेरवाशीण महोत्सवात’ यंदाही कमालीची रंगत आली. पाली येथून जवळच असणाऱ्या पिवरे येथे ‘मनमुक्त’ फाऊंडेशन सातत्याने कार्यक्रमाचे आयोजन करत असते. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून महिला भारतीय संस्कृतीला साजेसा पोशाख परिधान करून या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. आपण माहेराला आलो की सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. हा प्रत्यय या महोत्सवाच्या निमित्ताने महिलांना आला. प्रास्ताविकमध्ये अस्मिता काळण यांनी आपली भूमिका मांडली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही महिलांचा गुणगौरव सोहळा यावेळी पार पडला, त्याबद्दल ‘मनमुक्त’च्या संचालक मुक्ता भोसले यांनी भूमिका मांडली. मनीषा कुऱ्हाडे व मनस्वी गोंधळी यांनी सर्वांचे स्वागत केले. पनवेल, चर्चगेट, वाशी, पुणे, ठाणे, दादर, मलबार हिल, सातारा, विटा, कुंकूडवाड, चाकण, शिवाजीनगरवाडी अशा अनेक ठिकाणांवरून आलेल्या महिलांनी यात आपला सहभाग नोंदविला

विशेषतः आदिवासी महिलांचा या उपक्रमात महत्त्वाचा सहभाग होता. पनवेल येथील ‘नाच गं घुमा’ टीमने स्त्रीत्वाचा सन्मान, आनंदी जीवन, तसेच रूढी-परंपरा याचे महत्त्व फुगडीच्या वेगवेगळ्या प्रकारांतून सादर केले. स्त्री कर्तृत्वाचा सत्कार म्हणून सामाजिक क्षेत्रांत काम करणाऱ्या आदिवासी महिलांचा सन्मान करण्यात आला. सर्व माहेरवाशिणींनी पुरणपोळी, जेवणाचा, निसर्गाचा आनंद घेतला. ‘व्यक्त व्हा, मुक्त व्हा, रिक्त व्हा’ या संस्थेच्या टॅगलाईनप्रमाणे सर्वांनी आपला आनंद, भावना व्यक्त केल्या.

या कार्यक्रमात विकलांग मुलांनी बनवलेल्या वस्तू, विकलांग मुलांनी बनवलेले दिवे, ज्वेलरी, आकाश कंदील, तसेच आदिवासी महिलांचे फराळ व मसाल्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वितेसाठी फाऊंडेशनच्या संचालिका मुक्ता भोसले, अस्मिता काळण, मनीषा खुराडे, सखुबाई खुराडे व संपूर्ण कोअर टीमने परिश्रम घेतले. शेवटी आयुष्य सुंदर कसे आहे, यावर नामदेव भोसले यांनी मार्गदर्शन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here