प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी– राज्यात गोवरच्या साथीचा उद्रेक झालेला असतानाच चिपळूण तालुक्यात एक बालक गोवरने आजारी असल्याचे आढळून आले आहे. हा बालक मुंबईतून चिपळुणात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून, हा बालक राहत असलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिसरात अन्य कोणाला गोवरची लागण झाली आहे का, याचे सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे . https://sindhudurgsamachar.in/जुन्या-घराच्या-खरेदीनंतर/
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच राज्यात मुंबई, भिवंडी, मालेगाव व अन्य शहरांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्याने राज्यातील आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. शासनाने राज्यभरातील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणेकडून गोवरबाबत सतर्कता बाळगण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील गोवर संशयित २२ बालकांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी मुंबईतून आलेल्या बालकाला गोवर झाल्याचे स्पष्ट झाले असून, अन्य २१ बालकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीही आरोग्य विभाग जिल्ह्यात गोवरबाबत सतर्क आहे.