दापोली– दापोली येथे नुकत्याच पार पडलेल्या गिम्हवणे केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडास्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श मराठी शाळा चंद्रनगर या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. दापोली येथील मराठा मंदिर प्रशालेच्या क्रीडांगणावर या केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा नुकत्याच पार पडल्या.https://sindhudurgsamachar.in/kolhapur-भावी-शिक्षक-भरतीच्या-
सांघिक क्रीडा प्रकारात मुलांच्या लहान व मोठा अशा दोन्ही गटांत चंद्रनगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी कबड्डीत विजेतेपद पटकावले. याशिवाय खो-खो मोठा गट मुलांच्या स्पर्धेत विजेतेपद तर लहान गटात उपविजेतेपद पटकावले. खो-खो मुलींच्या मोठ्या गटात उपविजेतेपद तर मुलींच्या लंगडी स्पर्धेत मोठ्या गटात उपविजेतेपद पटकावले.
वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्येही दैदीप्यमान यश संपादन करताना चंद्रनगर शाळेचा विद्यार्थी आयुर महेश मुलूख याने उंच उडी प्रकारात प्रथम क्रमांक, गोळाफेक क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक तर थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. चंद्रनगर शाळेच्या अथर्व रांगले याने लहान गटातील गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. याशिवाय वेदीका मुलूख हिने मोठ्या गटात थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक तर दीप शिगवण याने लहान गटात ५० मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून चंद्रनगर शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. या शाळेचे विद्यार्थी असलेल्या यश मिसाळ, अथर्व रांगले, सौम्या बैकर या मुलांनी सांघिक खेळांमध्येही उपस्थित सर्वांची वाहवा मिळवली.
याशिवाय शमिका मुलूख, विराज मुलूख, दिया मुलूख, आरोही मुलूख, श्रावणी कोळंबे, प्रसाद शिगवण, दीप शिगवण, सौम्या बैकर, यश मिसाळ, अथर्व रांगले, इशांत!पागडे, आयुर मुलूख, विघ्नेश मुलूख, वेदीका मुलूख आदी मुलांची पुढील प्रभागस्तरीय सांघिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चंद्रनगर शाळेने मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश रांगले, उपाध्यक्ष राकेश शिगवण, सरपंच भाग्यश्री जगदाळे, केंद्रप्रमुख प्रविण काटकर, मुख्याध्यापक रीमा कोळेकर आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.