सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गोठवेवाडी जंगल परिसरात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. राहुल संजय झेंडे ( २५, रा. वडारवाडी, उत्तर शिवाजी नगर, सांगली मिरज ) असे त्याचे नाव आहे. शिवापूर येथे तो गवंडीकाम करीत असे.
काही दिवसांपूर्वी तो आपल्या सहकार्यासमेवेत येत असताना वाटेत हरवला होता. सतत दारुच्या नशेत असल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे त्याच मानसिक स्थितीत तो वाट चुकला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ड्युमिंग डिसोजा व हवालदार मनोज राऊत हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.